नागपूर जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:49 AM2019-03-04T10:49:34+5:302019-03-04T10:51:09+5:30
नागपूर जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री वादळाचा पुन्हा तडाखा बसला. यात रामटेक तालुक्यातील शिवनी (भोंडकी) शिवारात गारपीट झाली तर मौदा तालुक्यात कोदामेंढी येथे घराची पडझड झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री वादळाचा पुन्हा तडाखा बसला. यात रामटेक तालुक्यातील शिवनी (भोंडकी) शिवारात गारपीट झाली तर मौदा तालुक्यात कोदामेंढी येथे घराची पडझड झाल्याची माहिती आहे. अवकाळी पाऊन आणि गारपीट यामुळे या परिसरातील गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रामटेक तालुक्यात धानाच्या पिकाची कापणी केल्यानंतर बहुतांश शेतकरी गहू आणि हरभऱ्याची पेरणी करतात. तालुक्यात चालू हंगामात चार हजार हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी केली आहे. सध्या या गव्हाच्या लोंब्या पक्व होण्याची प्रक्रिया सुरू असून, काही शेतांमधील गव्हाचे पीक कापणीला आले आहे. त्यातच शनिवारी मध्यरात्री रामटेक तालुक्यातील महादुला, शिवनी, किरणापूर, भंडारबोडी परिसरात जोरदार वादळासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या तर काही शिवारात गारपीट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
विशेष म्हणजे, या पावसासंदर्भात हवामान खात्याने कोणताही अंदाज व्यक्त केला नव्हता. त्यामुळे अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे महादुला (ता. रामटेक) येथील सोमा डडुरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पीक लोळले आहे. दुसरीकडे, शिवनी व किरणापूर शिवारात गारपीट झाल्याची माहिती शिवनी येथील माजी उपसरपंच हेमराज बडवाईक यांनी दिली. यासंदर्भात मुसेवाडी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी पटले यांनी सांगितले की, अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या या सरींमुळे गव्हाच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना कृषी सहायकांना दिल्या आहेत. त्यांचा पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशान्वये पुढील कार्यवाही केली जाईल, असेही पटले यांनी स्पष्ट केले. कोदामेंढी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने झोडपून काढले.