रामबाग कॉलनीत आढळले दुर्मिळ रक्तलोचन घुबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 06:01 PM2023-07-21T18:01:46+5:302023-07-21T18:01:59+5:30
रामबाग कॉलनी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी परिसरात शुक्रवारी दुर्मिळ रक्तलोचन घुबड सापडले.
आनंद डेकाटे
नागपूर: रामबाग कॉलनी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी परिसरात शुक्रवारी दुर्मिळ रक्तलोचन घुबड सापडले. त्याची प्रकृती बरी नव्हती. अशा अवस्थेत घुबड सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. रामबाग परिसरात डी.एस रॉयल इनफिल्ड सर्विस सेंटरचे इमरान शेख यांना झुडपी परिसरातील आकाशात कावळे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. ते जमिनीच्या दिशेने येऊन काव-काव करीत होते. इमरान यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक मोठे जंगली घुबड आढळून आले. लोकांनी गर्दी केली. सर्पमित्र अललेले आशीष मेंढे, पियुष पुरी व मयुर कुरटकर यांना याबाबतची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हे घुबड आजारी असल्याचे लक्षात आले. घुबडाचे नख खुप मोठे असल्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून अत्यावश्यक उपचारासाठी वनविभागाकडे सोपवले.
माजी पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने यांनी या घुबडाविषयी माहिती देताना सांगितले की, हे घुबड दुर्मिळ जातीत मोडणारे "mottled wood owl" (रक्तलोचन घुबड) आहे. या घुबडाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार शेड्युल - १ अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे.
रक्तलोचन घुबड ओळखण्याची खूण म्हणजे याच्या वरील बाजूस पांढरे व तांबूस चट्टे असतात.तर खालील बाजू पांढुरकी असून त्यावर गडद तपकिरी रेषा तसेच लालसर-तपकिरी चट्टे व पट्टे असतात. फिक्कट चपट्या चेहऱ्यावर काळ्या वर्तुळाकार रेषा व डोळे गडद असतात. या घुबडाचे मुख्य खाद्य खारी, छोटे सरपटणारे प्राणी, उंदीर, सरडे, खेकडे, कीटक आहेत. हा पक्षी निशाचर असून झुडपी तसेच जंगल क्षेत्रात वास्तव्याला असतो.