गोरेवाड्यात दुर्मिळ युरेशियन घुबड!
By admin | Published: March 1, 2017 02:22 AM2017-03-01T02:22:22+5:302017-03-01T02:22:22+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपुरात आलेल्या युरेशियन या दुर्मिळ घुबडाला
लहान पिंजऱ्याची वानवा : वडसा येथून उपचारासाठी आणले
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून गंभीर अवस्थेत उपचारासाठी नागपुरात आलेल्या युरेशियन या दुर्मिळ घुबडाला गोरेवाडामधील रेस्क्यू सेंटरमध्ये पोहोचविण्यात आले आहे.
माहिती सूत्रानुसार मंगळवारी सकाळी डॉ. बी. एम. कडू यांच्या प्रमाणपत्रानंतर सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने या घुबडाला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरच्या वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. परंतु गोरेवाडा येथे या घुबडाला ठेवण्यासाठी लहान पिंजराच उपलब्ध नव्हता. त्यामुळे गोरेवाडा येथील वन अधिकारी सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट सेंटरच्या वन कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील लहान पिंजऱ्याची मागणी करू लागले. मात्र सेमिनरी हिल्स येथील वन कर्मचाऱ्यांनी आपला पिंजरा देण्यास नकार दिला. यामुळे गोरेवाडा येथील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, सेमिनरी हिल्स येथील वन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी गोरेवाडा येथे एका माकडासोबत असाच एक लहान पिंजरा दिला होता, परंतु तो पिंजरा अजूनपर्यंत परत मिळाला नाही. त्यामुळे तो अनुभव लक्षात घेता, सेमिनरी हिल्स येथील वन कर्मचाऱ्यांनी यावेळी आपला पिंजरा देण्यास स्पष्ट नकार दिला. दुसरीकडे गोरेवाडा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक रेस्क्यू सेंटर बांधण्यात आले आहे. परंतु असे असताना येथे अशा छोट्या पक्ष्यांना ठेवण्यासाठी पिंजरा नसल्याची बाब पुढे आली आहे. जाणकारांच्या मते,हा युरेशियन घुबड सामान्य घुबडाच्या तुलनेत मोठा आहे. परंतु तो महाराष्ट्रात सहज दिसत नसल्याने, त्याला दुर्मिळ मानल्या जाते. मागील १४ फेब्रुवारी रोजी हा घुबड वडसा वन परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांना एका झाडावर सापडला होता. तो पतंगीच्या मांजाने गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला लगेच उपचारासाठी नागपुरात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्यावर सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार सुरू होते. शेवटी मंगळवारी त्याला गोरेवाडा येथे रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी)
बिबट्याची पुनरावृत्ती होणार का?
गोरेवाडा येथे छोट्या वन्यप्राण्यांसाठी लहान पिंजरा नसल्याने नुकत्याच काही दिवसांपूर्वी येथील एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवलेला बिबट्याचा बछडा पिंजऱ्यातून पळाल्याची घटना घडली आहे. माहिती सूत्रानुसार तो बिबट अजूनपर्यंत गोरेवाडा वन विभागाला सापडलेला नाही. त्यामुळे या घुबडा सोबतसुद्धा तीच पुनरावृत्ती होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथे छोटे वन्यप्राणी आणि पक्ष्यांना ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील वन अधिकारी आणि कर्मचारी जागा मिळेल त्या पिंजऱ्यात त्यांना ठेवतात आणि त्यातून बिबट्याच्या पलायनासारख्या घटना पुढे येतात.