नागपुरात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ फॉस्टेन कॅट साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:49 AM2020-08-17T07:49:50+5:302020-08-17T07:50:46+5:30
शहरातील वाठोडा चौकामध्ये १५ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या सुमारास एका झाडावर दुर्मिळ फॉस्टेन कॅट हा साप आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाठोडा चौकामध्ये १५ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या सुमारास एका झाडावर दुर्मिळ फॉस्टेन कॅट हा साप आढळला. नागरिकांनी सर्पमित्र अंकित खळोदे व आदर्श निनावे यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी मोठ्या शिताफीने या पाच फूट लांबीच्या सापाला झाडावरून रेस्क्यू केले. हा साप दुर्मिळ जातीचा फॉस्टेन कॅट असून शहरात पहिल्यांदाच आढळला. तो निमविषारी गटात मोडतो. याचे मुख्य खाद्य छोटे पक्षी, पाल, उंदीर, वटवाघूळ आहे. हा साप झाडांवर तसेच रात्री जंगलातल्या रस्त्यावरसुद्धा पाहायला मिळतो. साप आढळलेल्या ठिकाणी गॅरेज असल्यामुळे बाहेरील प्रदेशातील ट्रक दुरुस्तीसाठी येतात. अशाच एखाद्या ट्रकच्या माध्यमातून हा साप शहरात पोहचला असावा व आश्रयासाठी झाडावर चढला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. या सापाला त्याच्या अधिवासाच्या दृष्टीने योग्य असलेल्या ठिकाणी निसर्गमुक्त करण्यात आले.