कोरोनाकाळातही ‘सुपर’मध्ये दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:10+5:302021-05-10T04:08:10+5:30

नागपूर : कोरोनाच्या नावाखाली अनेक खासगी व शासकीय रुग्णालयांत ‘नॉन कोविड’ रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, तिथे मेडिकलशी ...

Rare heart surgery in the ‘super’ even in the coronal period | कोरोनाकाळातही ‘सुपर’मध्ये दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया

कोरोनाकाळातही ‘सुपर’मध्ये दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया

Next

नागपूर : कोरोनाच्या नावाखाली अनेक खासगी व शासकीय रुग्णालयांत ‘नॉन कोविड’ रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, तिथे मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘ओपीडी’मध्ये रुग्णांची गर्दी कायम आहे. शिवाय, मोठ्या संख्येत शस्त्रक्रिया सुद्धा होत आहेत. नुकतीच एका महिलेवर दुर्मीळ शस्त्रक्रिया करून तिच्या हृदयात निर्माण झालेले छिद्र बिनाटाक्याने बंद केले. अत्यंत किचकट व गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आपल्या अनुभव कौशल्यातून यशस्वी केली. रुग्णाला जीवनदान दिले.

नागपुरातील रहिवासी असलेल्या महिलेला वयाच्या ४४ वर्षी अचानक हृदयात छिद्र निर्माण झाले. यामुळे हृदयातील मुख्य धमणीकडून उजव्या बाजूच्या भागात रक्त प्रवाह सुरू झाला. याला वैद्यकीय भाषेत ‘आरएसओव्ही इन आरव्हीडीटी’ असे म्हणतात. रुग्णाला हृदयात प्रचंड वेदना व श्वास घेण्याच अडचण जात होती. हृदय बंद पडण्याची शक्यता होती. रुग्णाचा जीवाला धोकाही निर्माण झाला होता. ही महिला मेडिकलला १३ मार्च २०२१ रोजी भरती झाली. नंतर त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागात पाठविण्यात आले. तेथून त्यांना इकोकार्डियाग्राफीसाठी हृदयरोग विभागात पाठविण्यात आले. येथील विभागप्रमुख डॉ. पी.पी. देशमुख यांनी या रुग्णाला तपासले. रुग्णाची स्थिती पाहून त्यांनी तातडीने छिद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.

‘लोकमत’शी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, रुग्ण गरीब होता. त्याच्याकडे औषधोपचारासाठी पैसे नव्हते. यातच हा आजार दुर्मीळ असल्याने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट नव्हता. यामुळे आमच्या विभागातील डॉक्टरांनी विशेष प्रयत्न करून व वरिष्ठांशी बोलून ७० हजार रुपयांची मान्यता मिळवली. रुग्णांच्या आवश्यक चाचण्या व त्याची प्रकृती स्थिर करून २३ मार्च २०२१ रोजी रुग्णाला शस्त्रक्रिया गृहात घेतले. अत्यंत किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती; परंतु अनुभवाच्या बळावर व कौशल्यातून ‘डिव्हाइस क्लोजर’द्वारे बिनाटाक्याने हृदयाचे छिद्र बंद करण्यात यश मिळविले. २६ मार्च रोजी रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. विशेष म्हणजे, स्ट्रेचरवर आलेली ही महिला रुग्ण चालत आपल्या घरी गेली. याला आता एक महिन्याचा कालावधी होत असताना रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. नागपुरातच नव्हे तर मध्य भारतातील ही दुर्मीळ शस्त्रक्रिया आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले. ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या सहकार्याने डॉ. पी.पी. देशमुख यांनी केली. त्यांना डॉ. अतुल राजपूत व डॉ. मोहित सिंग यांनी मदत केली.

Web Title: Rare heart surgery in the ‘super’ even in the coronal period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.