मेडिकलमधील दुर्मिळ घटना : 'डेथ सर्टिफिकेट' दिलेले बालक झाले जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:45 PM2020-02-10T23:45:32+5:302020-02-10T23:46:13+5:30

डॉक्टरांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हाती ‘डेथ सर्टिफिकट’ही दिले. आईचा हुंदका थांबत नव्हता. घरी आणताच तिने हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना चिमुकल्याने श्वास घेतला. आई-वडिलांची धावपळ उडाली.

Rare Occurrence in Medical: Death Certificate issued Child become alive | मेडिकलमधील दुर्मिळ घटना : 'डेथ सर्टिफिकेट' दिलेले बालक झाले जिवंत

मेडिकलमधील दुर्मिळ घटना : 'डेथ सर्टिफिकेट' दिलेले बालक झाले जिवंत

Next
ठळक मुद्देअधिष्ठात्यांनी दिले चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्याच्या चिमुकल्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. नागपुरात नेल्यावर तो वाचेल, या आशेने त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु दुसऱ्याच दिवशी चिमुकल्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हाती ‘डेथ सर्टिफिकट’ही दिले. आईचा हुंदका थांबत नव्हता. घरी आणताच तिने हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना चिमुकल्याने श्वास घेतला. आई-वडिलांची धावपळ उडाली. तातडीने एका खासगी इस्पितळात हलविले. आज सात दिवस होऊनही चिमुकला जिवंत आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना.
याला वैद्यकीय भाषेत ‘सस्पेंडेड अ‍ॅनिमेशन’ किंवा तात्पुरती मृतावस्था म्हटले जाते.
अमरावतीच्या बडनेरा येथील एका घरात मूल झाल्याने आनंदाचे वातावरण होते. परंतु दोन महिन्यांतच चिमुकल्याची प्रकृती खालावली. स्थानिक डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी नागपुरात उपचार घेण्याचा सल्ला दिला. २ फेब्रुवारी रोजी मोठ्या आशेने ते नागपुरात आले. मेडिकलच्या बालरोग विभागात चिमुकल्याला भरती केले. डॉक्टरांनी विविध चाचण्या करीत मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान केले. उपचाराला सुरुवात झाली. परंतु दुसऱ्याच दिवशी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास चिमुकल्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या स्थितीत चिमुकल्याला घरी आणले. आजूबाजूचे लोक जमले. एकाने चिमुकल्याच्या शरीरावरील पांढरे कापड काढले. तर त्याला हालचाल दिसून आली. आणखी निरखून पाहिल्यावर चिमुकला श्वास घेत असल्याचे आढळून आले. तातडीने त्याला अमरावतीच्या एका खासगी इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटर लावले. दोन दिवसांनंतर प्रकृती सुधारत असल्याचे पाहत व्हेंटिलेटर काढले. सात दिवसानंतरही चिमुकला उपचाराला प्रतिसाद देत आहे. परंतु झालेल्या घटनेने चिमुकल्याचा वडिलांनी मेडिकलच्या कारभारावर संताप व्यक्त केला. याची माहिती मेडिकलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांना महिती होताच त्यांनी त्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला आणि दुर्मिळातील दुर्मिळ घटनांमध्ये असे होत असल्याची माहिती दिली.

नवजात शिशूंमध्ये अशा दुर्मिळ घटना होतात
डॉ. दीप्ती जैन यांनी सांगितले, कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या बालकांमध्ये विशेषत: थंडीच्या दिवसात अशा दुर्मिळातील दुर्मिळ घटना घडतात. याला वैद्यकीय भाषेत ‘सस्पेंडेड अ‍ॅनिमेशन’ म्हटले जाते. थंडीमुळे शरीरातील हालचाली एवढ्या मंदावतात की मृत्यू झालेल्या शरीरातील लक्षणे व यांच्यातील लक्षणे सारखीच असतात. या चिमुकल्यासंबंधी तसेच झाले. परंतु अशा घटनांमध्ये फारपेक्षा फार कमी बालके पुढे जिवंत राहतात.

दुर्मिळ घटना असली तरी चौकशीचे आदेश
‘सस्पेंडेड अ‍ॅनिमेशन’ ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. या घटनेचे अनेक प्रकरणे आहेत. तरीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यावरच पुढे काही बोलता येईल.
डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल.

 

Web Title: Rare Occurrence in Medical: Death Certificate issued Child become alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.