विदर्भात आढळले दुर्मीळ पाणमांजर : पहिलीच फोटोग्राफिक नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 08:47 PM2020-02-12T20:47:00+5:302020-02-12T20:51:05+5:30
स्मूथ कोटेड ऑटर (पाणमांजर) या प्राण्याची विदर्भात नुकतीच नोंद झाली असून या प्राण्याचे छायाचित्र प्रथमच मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मूथ कोटेड ऑटर (पाणमांजर) या प्राण्याची विदर्भात नुकतीच नोंद झाली असून या प्राण्याचे छायाचित्र प्रथमच मिळाले आहे. अमरावती येथील वाईल्डलाईफ अँड एनव्हायर्मेंट कन्झर्व्हेशन सोसायटीचे (वेक्स) सदस्य आणि वन्यजीव छायाचित्रकार लतीश डेकाटे आणि वन्यजीव अभ्यासक अंकित बाकडे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील एका नदीपात्रात नियमित पक्षी अभ्यासादरम्यान हा प्राणी आढळून आला. त्याची छायाचित्रे घेण्यात लतीश डेकाटे यांना यश आले आहे.
डब्ल्यूसीटीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत वडतकर आणि वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे आदित्य जोशी यांनी या प्राण्याची छायाचित्रे पाहिल्यावर तो स्मूथ कोटेड ऑटर असल्याचे निश्चित केले. स्थानिक भाषेत या प्राण्याला पाणमांजर किंवा हुदळे नावाने ओळखल्या जाते. ही प्रजाती धोकाग्रस्त श्रेणीमध्ये समाविष्ट असून विदर्भात पूर्वी मोठ्या नद्यांमध्ये आढळत होती. अलीकडे कुठेच सापडत नसल्याची माहिती आहे.
भारतात दुर्मीळ असलेल्या प्राण्याच्या अंगावर करड्या रंगाचा मऊशार केसांचा कोट आणि जबड्याचा खालील भागापासून गळ्यापर्यंतचा पांढरा रंग यामुळे ही प्रजाती सहज ओळखता येते. नाकावरच्या इंग्रजी व्ही प्रमाणे रंगाच्या खुणेमुळेसुद्धा त्याला ओळखणे सोपे असते.
जलप्रदूषणाचे पाणमांजरावर संकट
विदर्भातील तापी, वैनगंगा, इंद्रावती अशा काही मोठ्या नद्यांमध्ये फार पूर्वी पाणमांजर या दुर्मीळ जलचर सस्तन प्राण्यांचे अस्तित्व होते. मात्र अलीकडे नद्या कोरड्या पडल्यामुळे आणि जलप्रदूषणामुळे हा जलचर प्राणी अतिशय दुर्मीळ झाला आहे. अलीकडे विदर्भात कुठेच या प्राण्याची नोंद आढळून आली नव्हती. अतिशय लाजाळू असलेल्या या प्राण्याचे छायाचित्रसुद्धा अलीकडे मिळालेले नसल्याने त्यास अतिशय दुर्मीळ समजले जात आहे.
देशात तीन जाती
आपल्या देशात या पाणमांजरांच्या स्मूथ कोटेड ऑटर, आशियन स्माँल क्लाँ ऑटर आणि युरेशियन ऑटर या तीन प्रजाती आढळतात. यापैकी मध्य भारतात स्मूथ कोटेड ऑटर या प्रजातीचाच आढळ आहे. युरेशियन ऑटर या प्रजातीची अलीकडेच मध्य प्रदेशात नोंद झाली आहे.