उपराजधानीत ९ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:32 PM2020-03-06T21:32:54+5:302020-03-06T21:35:47+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘युरोलॉजी’ विभागाचे प्रमुख धनंजय सेलुकर यांनी ९ वर्षाच्या मुलावर ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकच मूत्रपिंड, आतड्यांच्या मागे तेही मूत्राशयाच्यावर. मूत्रपिंडाच्या आत २२ एमएमचा खडा. ‘क्रिएटिनिन’चा स्तर १४वर पोहचलेला. जीवघेण्या वेदनेने ९ वर्षाचा मुलगा अर्धमेला झालेला. अशा रुग्णावर शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. परंतु रुग्णाची स्थिती पाहता शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘युरोलॉजी’ विभागाचे प्रमुख धनंजय सेलुकर यांनी ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. चिमुकल्याला नवे जीवन मिळाले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधीलच नाही तर मध्यभारतातील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.
रवींद्र लक्ष्मण पटले (९) रा. वर्धा, त्या रुग्णाचे नाव. जानेवारी महिन्यात अचानक त्याला उलट्या होऊन पोटात दुखायला लागले. आई-वडिलांनी तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांंनी सावंगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. येथील डॉक्टरांनी तपासून येथे या स्वरुपातील शस्त्रक्रिया होत नसल्याचे सांगितले. रुग्णाला नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. रवींद्रला नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने सलग १८ दिवस अतिदक्षता विभाग उपचार करण्यात आले. २० जानेवारी रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात पाठविण्यात आले. येथील डॉ. सेलुकर यांनी त्याची तपासणी केली. मूत्रपिंडात खडा असल्याने ते ‘ब्लॉक’ झाले होते. ‘क्रिएटीनिन’चा स्तर १४वर गेला होता. मूत्रपिंडावर सूजही होती. काही दिवस वॉर्डात भरती करून क्रिएटीनिनचा स्तर व सूज कमी करण्यात आली. डॉ. सेलुकर म्हणाले, अशा रुग्णावर शस्त्रक्रिया हाच पर्याय राहतो. परंतु रुग्णाची स्थिती पाहता शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढण्याचा धोका होता. दुसरे म्हणजे ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पीसीएनएल’ ही उपचारपद्धती आतापर्यंत मोठ्यांमध्येच केली जात होती. परंतु रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला.
आतड्यांना बाजूला सारून केली शस्त्रक्रिया
डॉ. सेलुकर म्हणाले, सामान्यत: मूत्रपिंड हे कंबरेत असते. परंतु या रुग्णामध्ये एकच मूत्रपिंड आणि ते मूत्राशयावर होते. यातही ते आतड्यांच्या मागे होते. यामुळे ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करणेही जोखमीचे होते. रुग्णाच्या कंबरेत एक छोटे छिद्र करण्यात आले. आतड्या बाजूला करीत दुर्बीण आत सोडण्यात आली. मूत्रपिंडातील खड्यावर लेझरचा मारा करण्यात आला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. विभागात लहान मुलावर केलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले.
डॉक्टरांच्या या चमूने घेतले विशेष परिश्रम
‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ला यशस्वी करण्यासाठी डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. प्रसाद उपलंगावार, डॉ. निकेत जैन, डॉ. प्रतीक लढ्ढा, डॉ. ऋषीकेश, डॉ. रजत, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. वली, डॉ. प्रसाद व डॉ. आशुतोष जयस्वाल, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.