नागपुरात चौकाचौकात मास्कची सर्रास ट्रायल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:05 AM2020-11-09T10:05:47+5:302020-11-09T10:08:37+5:30

‘लोकमत’ चमूने शहरातील महत्त्वाच्या चौकातील मास्क विक्रेत्यांकडे मास्कची मागणी केली असता स्वत: विक्रेत्यांनीच मास्क लावून पाहण्याचा धक्कादायक सल्ला दिला.

Rare trial of masks at intersections | नागपुरात चौकाचौकात मास्कची सर्रास ट्रायल 

नागपुरात चौकाचौकात मास्कची सर्रास ट्रायल 

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका विक्रेत्याकडूनच मास्क लावून पाहण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधक म्हणून मास्क महत्त्वाचा घटक आहे. परंतु चौकाचौकातील मास्क विक्रेत्यांकडे येणारा ग्राहक तीन ते चार मास्क तोंडाला लावून पाहत असल्याने म्हणजेच ट्रायल घेत असल्याने, संसर्गाचा धोका वाढला आहे. ‘लोकमत’ चमूने शहरातील महत्त्वाच्या चौकातील मास्क विक्रेत्यांकडे मास्कची मागणी केली असता स्वत: विक्रेत्यांनीच मास्क लावून पाहण्याचा धक्कादायक सल्ला दिला.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागला आहे. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी २ हजारावर गेलेली रुग्णसंख्या सध्या ३००च्या खाली आली आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात सॅनिटायझेन करणे व शारिरीक अंतर पाळणे आवश्यक आहे. विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकावर प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. परिणामी, चौकाचौकात मास्क विक्रीची दुकाने लागली आहेत. परंतु बनावक व दर्जाहिन मास्क यातच बहुसंख्य ग्राहक मास्क विकत घेताना तो तोंडाला लावून पाहत असल्याने प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे.

तुकडोजी महाराज चौक

 तुकडोजी महाराज चौकातील फूटपाथ मास्क विक्रेत्यांच्या दुकानांनी सजले आहे. यातील एका विक्रेत्याकडे प्रतिनिधीने मास्कची मागणी करताच त्याने वेगवेगळ्या किमतीचे मास्कच हातात ठेवले. मास्क तोंडावर नीट बसतो की नाही ते पाहण्यासाठी मास्क लावून पाहण्याचा सल्लाही विक्रेत्याने दिला. बहुसंख्य मास्क बनावट व दर्जाहीन असल्याचे आढळून आले.

मेडिकल चौक

कोविड हॉस्पिटलपासून काही अंतरावर असलेल्या मेडिकल चौकात मास्क विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. येथे येणारा बहुसंख्य ग्राहक हा रुग्ण किंवा त्याचा नातेवाईक असतो. ‘लोकमत’ प्रतिनिधीने विक्रेत्याला मास्क विकत घेण्यासाठी तो तोंडाला लावून पाहण्याचा आग्रह केल्यावर त्याने कुठलेही आढेवेढे न घेता होकार दिला. याचवेळी त्याच्याकडे आलेले ग्राहकही मास्क लावून पाहत होते.

सीताबर्डी चौक

सीताबर्डी चौकात एका विक्रेत्याकडे ‘एन-९५’ पासून ते ‘टू’ व ‘थ्री-लेअर मास्क’ उपलब्ध होते. काही मास्क रंगीत कापडाचे होते. परंतु बहुसंख्य मास्क दर्जाहीन व बनावट होते. प्रतिनिधीने मास्कची मागणी करताच विक्रेत्याने प्लॅस्टिकचे कव्हर काढून हातात मास्क ठेवले. मास्क लावून पाहण्यासही सांगितले. काही मास्क त्याने स्व:ताला लावून कसा दिसतो याचे प्रात्यक्षिकही दिले.

भीती वाटते, पण नाईलाज आहे

फूटपाथवरील मास्क विक्रेत्याकडे आलेल्या एका ग्राहकाला बोलते केले असता, तो म्हणाला, जोपर्यंत मास्क तोंडाला लावून पाहणार नाही, तो पर्यंत कसे कळणार मास्क योग्य आहे की नाही. राहिला प्रश्न कोरोनाचा. त्याची भीती वाटते, पण नाईलाज आहे.

यावर नियंत्रण कुणाचे?

रस्त्यावर मास्क विकत घेताना अनेक ग्राहक मास्क तोंडाला लावून पाहतात. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक पटीने वाढते. यावर नियंत्रण कुणाचे, हा प्रश्न आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-डॉ. अविनाश गावंडे

वैद्याकीय अधीक्षक, मेडिकल

Web Title: Rare trial of masks at intersections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.