कुठल्याही पदावर नसताना रश्मी बर्वे बैठकीच्या मंचावर कशा?

By गणेश हुड | Published: July 18, 2024 09:11 PM2024-07-18T21:11:15+5:302024-07-18T21:22:53+5:30

जिल्हा परिषद सदस्य मात्र सरपंचांच्या रांगेत: विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांची नाराजी

Rashmi Barve on the platform of the meeting without any position? | कुठल्याही पदावर नसताना रश्मी बर्वे बैठकीच्या मंचावर कशा?

कुठल्याही पदावर नसताना रश्मी बर्वे बैठकीच्या मंचावर कशा?

नागपूर:  जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे संथ गतीने सुरू असल्याने अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. यापार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या मंचावर बसण्याचा मान कुठल्याही पदावर नसलेल्या जि.प.च्या माजी अध्यक्ष रश्मी  श्यामकुमार बर्वे यांना देण्यात आला. दुसरीकडे ज्येष्ठ जि.प.सदस्यांना मात्र खाली खूर्चीवर बसावे लागले. यावर विरोधकांसोबतच सत्तापक्षाच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने जिल्हा परिषदेत नवा वाद निर्माण झाला आहे. 

जलजीवन मिशन योजनेसंदर्भात असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तालुकानिहाय कामांचा आढावा घेतला. यावेळी  मंचावर उपाध्यक्ष कुंदा राऊत, सीईओ सौम्या शर्मा, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांच्यासोबतच ,रश्मी बर्वे यांना बसण्याचा मान देण्यात आला. बर्वे यांचे जि.प.सदस्यत्व रद्द  करण्यात आल्याने त्यांना बैठकीच्या मंचावर बसण्याचा खटाटोप पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी का केला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बर्वे यांची मंचावरील उपस्थिती कुठल्याही नियमात बसत नसल्याने यावर आम्ही आक्षेप घेतला होता. हा प्रकार योग्य नसून यातून चुकीच पायंडा पाडला जात असल्याचे जि.प.सदस्य सुभाष गुजरकर म्हणाले. बैठकीचे आयोजन करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाने रश्मी बर्वे यांना मंचावर बसवायला नको होते. अशी प्रतिक्रीया बैठकीला उपस्थित काँग्रेसच्या सदस्यांनी दिली. ‘आमचेच दात आणी ओठ’ तक्रार कुणाकडे करणार अशी व्यथा काँग्रेसच्या सदस्यांनी मांडली. मात्र नाव छापू नका कारण आम्हाला काँग्रेस पक्षातच राहावयाचे आहे. याबाबत वरिष्ठांनीच समज देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rashmi Barve on the platform of the meeting without any position?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर