रश्मी नांदेडकर यांची नागपुरात एसपी एसीबी म्हणून नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:06 PM2019-07-16T12:06:30+5:302019-07-16T12:07:28+5:30
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपायुक्त म्हणून भंडारा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची नियुक्ती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपायुक्त म्हणून नागपुरात भंडारा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच त्या आपल्या पदाची जबाबदारी सांभाळणार असून, नागपूर एसीबीच्या अलीकडच्या कालावधीतील त्या पहिल्या महिला अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
नांदेडकर मूळच्या नांदुरा (जि. बुलडाणा) येथील रहिवासी होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदुरा येथे तर उच्चशिक्षण अकोला आणि पुण्यात झाले आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची थेट भरतीनुसार २०११ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात नियुक्ती झाली. त्यांची पहिली नियुक्ती आकोटला होती. २०१४ मध्ये त्यांची आकोटमधून सहायक आयुक्त म्हणून नाशिक शहरात बदली झाली.
२०१४ ते १६ पर्यंत त्या नाशिकमध्ये होत्या; नंतर ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली आणि त्या भंडारा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. आज त्यांना पदोन्नतीवर एसपी, नागपूर एसीबी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. शांत मात्र स्वच्छ प्रतिमेच्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात.
एसीबीतील महिला कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांमधील वाद भलत्याच वळणावर गेल्याने येथील मी टू प्रकरण चर्चेला आले. त्यामुळे नागपूर एसबीत अनेक धक्कादायक खुलासे झाले होते.
नागपूर एसबीच्या एसपीची खुर्ची महिन्याला एक ते दीड कोटी रुपये गोळा करणारी असल्याचाही बोभाटाही झाला होता. त्यामुळे ही खुर्ची मिळावी म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, वरिष्ठांनी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकारी म्हणून ओळख असलेल्या रश्मी नांदेडकर यांना ही जबाबदारी सोपविली आहे.
भ्रष्टाचार मुळासह उपटून काढू
आपण लवकरच पदाची सूत्रे स्वीकारणार आहोत. काही दिवस अभ्यास केल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवू आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या जास्तीतजास्त भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करू, असे मत त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.