राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचार्य ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:23 PM2018-09-03T23:23:00+5:302018-09-03T23:26:30+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळू शकला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे साडेचारशे महाविद्यालयातून या पुरस्कारासाठी अवघा एक अर्ज आला व गुणवत्तेच्या मापदंडात बसत नसल्याने संबंधित प्राचार्यांना अपात्र ठरविण्यात आले. जर प्राचार्यांची ही स्थिती असेल तर मग शिक्षक व विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Rashtra Sant Tukdoji Maharaj Nagpur University's Principal 'Fail' | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचार्य ‘नापास’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचार्य ‘नापास’

googlenewsNext
ठळक मुद्देएकालाही उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार नाही : साडेचारशे महाविद्यालयातून आला अवघा एक अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळू शकला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे साडेचारशे महाविद्यालयातून या पुरस्कारासाठी अवघा एक अर्ज आला व गुणवत्तेच्या मापदंडात बसत नसल्याने संबंधित प्राचार्यांना अपात्र ठरविण्यात आले. जर प्राचार्यांची ही स्थिती असेल तर मग शिक्षक व विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण होते. या पुरस्कारांत उत्कृष्ट प्राचार्य हादेखील पुरस्कार असतो. यासाठी प्राचार्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. मागील वर्षीपर्यंत या पुरस्कारासाठी दहा किंवा त्याहून अधिक अर्ज यायचे. यंदा अर्ज मागवितानाच विद्यापीठाने पात्रतेचे निकष स्पष्ट केले होते. या निकषांच्या आधारावर देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये ४५ टक्के गुण मिळविणे अनिवार्य होते.
उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासाठी अवघा एकच अर्ज आला. निकषांच्या पातळीवर मूल्यमापन केले असता संबंधित एका प्राचार्याला ४५ टक्क्यांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामुळे एकालाही पुरस्कार घोषित न करण्याचा विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला.

गुणवत्ता वाढीसाठी निकष ठरविले
यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनीदेखील प्राचार्यांच्या गटातून अवघा एकच अर्ज आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. दर वर्षी एक अर्ज आला असेल तर संबंधित व्यक्तीला पुरस्कार मिळत होता. मात्र यंदा आम्ही नियम कठोर केले व मापदंड निश्चित केले. एका दृष्टीने ही प्राचार्यांची परीक्षाच होती. यात त्यांना यश मिळविता आले नाही. पुरस्कारांचा दर्जा वाढावा व त्यानिमित्ताने गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रयत्न व्हावेत, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांचे सामाजिक कार्य घटले का ?
विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार देण्यात येतो. यासाठीदेखील अर्ज मागविण्यात आले होते. या गटातदेखील अवघा एकच अर्ज आला. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी केवळ ११ अर्ज आले.

अर्जांची स्थिती
पुरस्कार                  आलेले अर्ज                निवड
उत्कृष्ट प्राचार्य                 १                               -
उत्कृष्ट शिक्षक               २०                             २
उत्कृष्ट संशोधक            ११                             १
उत्कृष्ट लेखक                ३                              १
उत्कृष्ट सामाजिक कार्य  १                              -

 

Web Title: Rashtra Sant Tukdoji Maharaj Nagpur University's Principal 'Fail'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.