राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ निवडणुकीची रंगत चढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:49 PM2017-11-23T23:49:37+5:302017-11-23T23:52:40+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापीठ परिषदेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच चढली आहे. संघटनांनी प्रतिष्ठेचा बनविलेल्या या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी शिक्षक व प्राचार्याच्या संघटनांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापीठ परिषदेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच चढली आहे. संघटनांनी प्रतिष्ठेचा बनविलेल्या या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी शिक्षक व प्राचार्याच्या संघटनांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे. संघटना व उमेदवारांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही लावले जात आहे.
संघटनेच्या उमेदवारांचे प्रचार कार्य जोमात सुरू असताना, विद्यापीठ प्रशासनाने निवडणुका शांततेत होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या ड्युटीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व नियुक्तीपत्र दिले आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहु नये म्हणून शिक्षक व प्राचार्यांना २५ नोव्हेंबरला सुटी दिली आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे.
२७२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
विद्यापीठाच्या निवडणुकीत २७२ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहे. निवडणुकीसाठी नागपूर शहर, ग्रामीण बरोबरच विभागातील गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्हा मिळून ८६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. जळगाव येथे सुद्धा एक मतदान केंद्र आहे. विद्यापीठात आयोजित एका संमेलनात कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी सांगितले की सर्वाधिक मतदान केंद्र नागपुरात आहे. निवडणुकीत शिक्षक मतदारांची संख्या ५५४१ आहे. अध्ययन मंडळाच्या निवडणुकीत १०६० मतदार आहे. व्यवस्थापन प्रतिनिधीच्या निवडणुकीत १९४ तर प्राचार्य मतदाराची संख्या १६७ आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी २३९ अधिकारी नियुक्त केले आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
मोठा विजय मिळेल
यंग टीचर्स असोसिएशनतर्फे झालेल्या एका पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दावा केला की, आम्हाला मोठा विजय मिळेल. नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन यांनीही असाच दावा केला आहे. निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीने उतरलेल्या शिक्षण मंच व सेक्युलर पॅनल यांनी सुद्धा दावे-प्रतिदावे केले आहे.