राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा वाढला ‘स्ट्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:30 AM2020-02-15T11:30:24+5:302020-02-15T11:32:48+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे. गट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गातील अधिकाऱ्यांची तर ७५ टक्के पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत या वर्षी होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी व ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. विद्यापीठात गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील किती पदे रिक्त आहेत, यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नागपूर विद्यापीठात कर्मचारी व अधिकारी मिळून एकूण ३८ टक्के पदे रिक्त आहेत. अनेक विभागात तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जात आहे. ‘अ’ प्रवर्गातील ६० पैकी ४१ पदे रिक्त आहेत. तर ‘ब’ प्रवर्गातील ५२ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. दोन्ही प्रवर्गातील रिक्त पदांची टक्केवारी अनुक्रमे ६८.३३ व ८२.६९ टक्के इतकी आहे. ‘क’ प्रवर्गात ४७६ मंजूर पदे असून त्यातील १५८ पदे रिक्त आहेत. तर ‘ड’ प्रवर्गात २७६ पदांपैकी ८९ पदे रिक्त आहेत.
राज्य शासनाकडून हिरवा ‘सिग्नल’ नाही
विविध विभागांतील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ३८ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागांतील कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याचा फटका विभागांमधील प्रशासकीय प्रणालीला बसतो आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तर कामाचा विशेष ताण आहे. परीक्षा विभागात तर अनेकदा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.
५० टक्के संवैधानिक पदेदेखील रिक्त
नागपूर विद्यापीठात कुलगुरू-प्र-कुलगुरूंसह एकूण १४ संवैधानिक पदे आहेत. यापैकी ७ पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाहीत. यात प्र-कुलगुरू, कुलसचिव, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक या पदांचा समावेश आहे. दुसरीकडे बगैर सुटीची १८ शैक्षणिक पदे आहेत. यातील ९ म्हणजे ५० टक्के पदे रिक्त आहेत.
विद्यापीठाचा दर्जा वाढणार कसा ?
या वर्षी ‘नॅक’चे मूल्यांकन होणार आहे. ‘नॅक’मध्ये ‘ए प्लस’ श्रेणी मिळविण्यासाठी विद्यापीठाला बरीच मेहनत करावी लागणार आहे. यात रिक्त जागांची संख्या डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ‘रँकिंग फ्रेमवर्क’ जाहीर करणाऱ्या ‘रँकिंग’मध्ये पहिल्या १०० मध्ये येण्यासाठी विद्यापीठाचा दर्जा वाढणे आवश्यक आहे. यासाठी रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत.