राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गरजू विद्यार्थ्यांना करणार आर्थिक मदत; 'विद्यार्थी सहायता'साठी अर्ज करण्याचे आवाहन
By आनंद डेकाटे | Published: January 18, 2024 03:22 PM2024-01-18T15:22:25+5:302024-01-18T15:23:08+5:30
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग तसेच विविध संलग्न कॉलेजांमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधीतून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह भाडे आणि जेवणाचा खर्च यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्याथ्यांनी आपले अर्ज विद्यार्थी विकास विभागाकडे प्राचार्य, विभागप्रमुख आणि संचालकांमार्फत सादर करावयाचे आहे. ५ फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे सादर न केल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज अमान्य केले जातील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेसाठीच्या अर्जाचा नमुना व संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या अर्जासह पालकांचे २०२३-२४ या वर्षाचे उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्र, मागील उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकांची साक्षांकित प्रत, अर्जात दिलेली इतर प्रमाणपत्रे आणि संबंधित प्राचार्यांचे पत्र सादर करावे असे आवाहन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी केले आहे.