राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:43 AM2019-10-03T00:43:10+5:302019-10-03T00:46:25+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला.

Rashtriya Swayamsevak Sangh: Enlightened National Concert | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देबाल व शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्तबद्ध संचलन, प्रत्येक पावलात दिसून येणारी लयबद्धता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि प्रात्यक्षिकांमधून दिसून येणारी ऊर्जा, वय लहान असले तरी राष्ट्र व समाजाप्रति असणारी समर्पण भावना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला.


शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाअगोदर बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील संघ पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला.

नंदनवन भाग
संघाच्या नंदनवन भागाच्या बाल शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव श्रीकृष्णनगरातील भारतीय विद्या भवनच्या मैदानावर आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे व वक्ता म्हणून संघाचे महानगर बौद्धिक प्रमुख रवींद्र सहस्रबुद्धे व भाग संघचालक अशोक बुजाने उपस्थित होते. याशिवाय सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील बाल स्वयंसेवकांचा हुरुप वाढविण्यासाठी उपस्थित होते. ज्या संघटनेचा प्राण हा अनुशासन, राष्ट्रहित,सुसंस्कार असतो, त्या संघटनेला अंत नसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच उद्देशाने कार्य करतो आहे. बालमनावर सुसंस्कार, अनुशासन आणि राष्ट्रहिताचे बीज पेरतो आहे, असे प्रतिपादन सहस्रबुद्धे यांनी केले. अनुशासन, सुसंस्कार यामुळे संघ चांगला नागरिक घडविण्याचे काम करतो आहे. मातृभूमीची सेवा, जीवसेवेसाठी स्वयंसेवकांची धडपड दिसून येते. संस्काराचे बीज रोवणाºया या संघटनेत एक चांगला नागरिक घडत असल्याची भावना मुक्कावार यांनी व्यक्त केली.

बिनाकी, सदर, गिट्टीखदान भाग
बिनाकी, सदर, गिट्टीखदान भागातील बाल शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव टेका नाका येथील पोलीस ग्राऊंड येथे झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ.हिमांशू दुआ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघ स्वयंसेवक कितीही मोठा झाला तरी तो आपला परिचय स्वयंसेवक म्हणूनच देतो. येथे सर्वधर्मसमभावाचे संस्कार देण्यात येतात व लहान मुलांतून एक चांगला नागरिक बनतो असे त्यांनी म्हटले.

अजनी-अयोध्या भाग
अजनी, अयोध्या भागातील बाल-शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव तारांगण मैदान,न्यू सुभेदार ले-आउट येथे संपन्न झाला. सनदी लेखापाल सुचित उस्केलवार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महानगर सहकार्यवाह उदयराव वानखेडे, अजनी भाग संघचालक डाँ. रमाकांत कापरे, अयोध्या भाग संघचालक मनोहरराव सपकाळ मंचावर उपस्थित होते. सर्वच संस्कार संघातून मिळतात व आज संघातून देशभक्त तयार होत आहेत. आचार-विचारातून संघ सगळ्या स्वयंसेवकांना घडवतो आहे, असे उस्केलवार म्हणाले. कार्यक्रमाला प्रामुख्याने महानगर अधिकारी सुभाषचंद्र देशकर, नेताजी चिंचोलकर, मुन्नाजी रहांगडाले, प्रकाश बापट, प्रसाद वरदळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

इतवारी व लालगंज भाग
मोहिते व इतवारी भागाच्या बाल स्वयंसेवकांच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन गणेशपेठ येथील गाडीखाना मैदानावर करण्यात आले. यावेळी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मेहनत आणि चिकाटी असेल तर काही पण साध्य करणे सोपे जाते. शारीरिक वाढीसाठी शाखेतील मैदानी खेळ मदतीचे ठरतात. मुलांनी मोठ्या व्यक्तींपासून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन डॉ. झुनझुनवाला यांनी केले.

धरमपेठ, त्रिमूर्तीनगर, सोमलवाडा भाग
धरमपेठ, त्रिमूर्तीनगर व सोमलवाडा भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांचा उत्सव प्रतापनगर येथील नवनिर्माण कॉलनीच्या मैदानात पार पडला. डॉ. अभय दातारकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व संघसंस्कारांच्या प्रेरणेतून आयुष्य कसे घडते, यावर भाष्य केले.

मोहिते भाग
मोहिते भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांचा उत्सव ईस्टर्न स्पोर्टस् क्लबजवळील एनआयटी मैदानात आयोजित करण्यात आला. धर्मपाल अग्रवाल हे प्रमुख अतिथी होते. त्यांनी संघाचे कार्य आणि सामाजिक जीवनातील संस्कार यांच्यावर प्रकाश टाकला. तसेच नवीन पिढीने आदर्श जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh: Enlightened National Concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.