राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणताे, निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’; समान नागरी कायदाही व्हावाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 08:27 AM2024-03-18T08:27:02+5:302024-03-18T08:27:43+5:30
"नवीन गोष्टी आल्या की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे"
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : निवडणूक रोख्यांबाबत संघाने अद्यापही बैठकीत चर्चा केलेली नाही. सध्या तरी हा एक प्रयोग आहे. तो किती फायदेशीर आणि प्रभावी ठरला हे कालांतराने कळेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी व्यक्त केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपाच्या दिवशी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाहपदी फेरनिवड झाली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना हाेसबळे म्हणाले, ‘निवडणूक रोखे’ आजच आले आहेत, असे नाही. यापूर्वीही अशी योजना करण्यात आली होती. जेव्हा-जेव्हा काही बदल होतात तेव्हा प्रश्न उपस्थित होतात.
ईव्हीएम आल्यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. नवीन गोष्टी आल्या की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे; पण ही नवी व्यवस्था किती फायदेशीर आणि परिणामकारक होती हे वेळ आल्यावर कळेल. त्यामुळे ते प्रयोगासाठी सोडले पाहिजे, अशी भूमिका सरकार्यवाह हाेसबळे यांनी स्पष्ट केली.
समान नागरी कायदा व्हावाच!
संघ समान नागरी कायद्याच्या बाजूनेच आहे. देशात समान नागरी कायदा व्हावा, यासाठी अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळात प्रस्ताव मांडला होता. उत्तराखंड राज्याने यात पुढाकार घेतला आहे. तेथील अनुभवानंतर हळूहळू संपूर्ण देशात हा कायदा लागू व्हायला हवा, असे हाेसबळे म्हणाले.