दुधावासीयांचे ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:07+5:302021-03-01T04:09:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : नजीकच्या दुधा-तारसी मार्गावरून मुरुमाची २४ तास ओव्हरलाेड वाहतूक सुरू असते. ट्रक व टिप्परमधील मुरुम ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : नजीकच्या दुधा-तारसी मार्गावरून मुरुमाची २४ तास ओव्हरलाेड वाहतूक सुरू असते. ट्रक व टिप्परमधील मुरुम राेडवर पडत असून, वाहनांच्या चाकांमुळे त्याची धूळ तयार हाेते. नागरिकांसह वाहनचालकांना त्या धुळीचा विनाकारण त्रास सहन करावा लागताे. शिवाय, ओव्हरलाेड वाहतुकीमुळे या राेडच्या काही भागात ठिकठिकाणी खड्डे तयार झाले असून, त्यामुळे अपघातही हाेत आहे. त्यामुळे ही ओव्हरलाेड वाहतूक बंद करावी तसेच या राेडची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करावी, या मागणीसाठी दुधा येथील नागरिकांनी रविवारी (दि. २८) या मार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन केले हाेते.
नागपूर-मुंंबई या द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाचे कंत्राट मेघा इंजिनियरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. नामक कंपनीला दिले आहेत. या या महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाचे खाेदकाम करून ताे वाहून देण्याची परवानगीही जिल्हा प्रशासनाने कंत्राटदार कंपनीला दिली आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने दुधा शिवारात मुरुमासाठी खाेदकाम करायला सुरुवात केली असून, तेथील मुरुम ट्रक व टिप्परद्वारे राेज वाहून नेला जाताे.
वाहनांमधील मुरुम राेडवर पडत असल्याने तसेच मुरुमाच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे राेडची दैनावस्था झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये असंताेष निर्माण झाला हाेता. या असंताेषातून नागरिकांनी रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास या आंदाेलनाला सुरुवात करण्यात आली. हे आंदाेलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू हाेते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तीन तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झाली हाेती. आंदाेलनादरम्यान नागरिकांनी केवळ मुरुमाची वाहतूक करणारे ट्रक व टिप्पर अडविण्याला प्राधान्य दिले हाेते. त्यामुळे दुचाकीचालकांसह प्रवासी वाहतूकदारांना या आंदाेलनाचा फारसा त्रास झाला नाही. आंदाेलनात पंचायत समिती उपसभापती संजय चिकटे, सरपंच प्रफुल्ल शेंडे, उपसरपंच मडावी, ग्रामपंचायत सदस्य धीरज हांडे यांच्यासह दुधा व तारसी येथील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
....
तीन तास वाहतूक ठप्प
दुधा येथील नागरिकांनी दुधा-तारसी मार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन केल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली हाेती. राेडच्या देान्ही बाजूला मुरुमाची वाहतूक करणाऱ्या ट्रक व टिप्परच्या लांबा रांगा लागल्या हाेत्या. मुरुमाचे खाेदकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या राेडची दुरुस्ती करून देण्याचे माैखिक आश्वासन दिल्याने नागरिकांनी हे आंदाेन दुपारी १२ वाजताच्या सुमारास मागे घेतले. यात प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लाेकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली.
...
अपघात वाढले
वाहतुकीदरम्यान ट्रक व टिप्परमधील मुरुम राेडवर पडताे. वाहनांच्या चाकांमुळे त्या मुरुमाची धूळ हाेते. ती धूळ डाेळे व श्वासाद्वारे फुफ्फुसात जात असल्याने दुचाकीचालकांसह इतर नागरिकांना त्रास हाेत आहे. डाेळ्यात धूळ गेल्याने चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी स्लीप झाल्याने चालक खाली काेसळूल गंभीर जखमी झाला. ही घटना दुधा-तारसी राेडवर आठ दिवसांपूर्वी घडली. या राेडवर अपघातांचे प्रमाण वाढत असल्यानेही नागरिक संतप्त झाले हाेते.
आंदाेलनाची माहिती मिळताच स्थानिक लाेकप्रतिनिधींसह प्रशासकीय व कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनस्थळ गाठून आंदाेलकांशाी चर्चा केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुधा-तारसी राेडची दुरुस्ती करून देण्याचे लेखी आश्वासन दुधा ग्रामपंचायत द्यावे अशी मागणी नागरिकांनी रेटून धरली हाेती. लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या दुरुस्तीचे माैखिक आश्वासन दिल्याने नागरिकांनी आंदाेलन तात्पुरते मागे घेतले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.