पारशिवनीत ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:24+5:302021-01-08T04:25:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, तिघेही मित्र आहेत. ही घटना पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी (दि. ६) सायंकाळी घडली. या घटनेचे पडसाद गुरुवारी (दि. ७) सकाळी उमटले. अपघात टाळण्यासाठी विविध उपाययाेजना कराव्या या मागणीसाठी शहरात ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन करण्यात आले.
एमएपी-४८/पी-०२९१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने एमएच-४०/बीबी-४१३७ क्रमांकाच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिल्याने दुचाकीवरील यश भालेराव (१७) व अनुप अतुल पनवेलकर (१४) या दाेघांचा मृत्यू झाला तर लकी चव्हाण (१४) हा गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी दाेघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर लकीला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे लकीवर प्रथमाेपचार करून त्याला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी ट्रॅव्हल्सचालक प्रकाश डहारे (४५, रा. मुलताई, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) याच्या विराेधात गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली.
या घटनेचे पडसाद गुरुवारी सकाळी उमटले. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. आंदाेलनाची तीव्रता लक्षात घेता रामटेक व देवलापार पाेलीस ठाण्यातून अतिरिक्त पाेलीस कुमक बाेलावण्यात आली हाेती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार वरूणकुमार सहारे व ठाणेदार संताेष वैरागडे यांच्या उपस्थित आंदाेलकांना उपाययाेजना करण्याचे फाेनवर आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
या आंदाेलनात नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, सलीम बाघाडे, भुजंग ढोरे, विजय भुते, रूपेश खंडारे, सचिन सोमकुवर, अनिता भड, सागर सायरे, वीरेंद्र गजभिये, दीपक शिवरकर, रोशन पिंपरामुळे, राहुल ढगे, किशोर वैद्य, चेतन देशमुख, सुरेंद्र चोरडिया, प्रमोद भड, अर्षद शेख, विजय बोथरा, रणजित ठाकूर, मोहन लोहकरे, पुखराज जैन, दीपचंद पालीवाल, दीपक भोयर, संजय कुंभलकर, सोनल वैद्य, शकील शेख, नीतू भुजाडे, परसराम राऊत, रितेश बावणे, आशिष भड, राधेश्याम नखाते यांच्यासह नागरिक सहभागी झाले हाेते.
...
या उपाययाेजना आवश्यक
पारशिवनी शहरातील अपघात टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकासोबतच साई लेआऊट चौक, बँक ऑफ इंडिया चौक, शासकीय रुग्णालय, तहसील कार्यालय चौक, महात्मा गांधी चौक या ठिकाणी तत्काळ गतिरोधक तयार करणे, दिवाणी व फौजदारी न्यायालय ते महात्मा गांधी महाविद्यालय या राेडवरील बंद असलेले पथदिवे सुरू करणे, वर्दळीच्या चौकात वाहतूक पोलील तैनात करणे, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे या उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली हाेती.
...
दाेघेही विद्यार्थी
यश हा माेटारसायकल चालवत हाेता. त्याने दहावी नापास झाल्यानंतर शिक्षण साेडले हाेते. अनुप व लकी मात्र बाभूळवाडा (ता. पारशिवनी) येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता नववीचे विद्यार्थी आहेत. तिघेही मित्र असून, ते सामान्य घरातील आहेत. यशचे वडील वाहनचालक म्हणून काम करतात.