रतन टाटा येणार संघस्थानी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:57 AM2019-05-26T00:57:49+5:302019-05-26T00:58:41+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. मागील वर्षी समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. मागील वर्षी समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली होती.
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यंदा नागपुरात २३ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ८२८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर १६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा यांच्यापर्यंत आमंत्रण पोहोचलेदेखील असून त्यांची अधिकृत स्वीकृती यायची आहे. येत्या आठवड्यात निश्चिती येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मंचावर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील उपस्थिती राहणार असून ते स्वयंसेवकांना उद्बोधन करतील.
एप्रिलमध्येच घेतली होती सरसंघचालकांची भेट
मागील काही काळ उद्योगपती रतन टाटा यांनी अनेकदा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. १८ एप्रिल रोजी त्यांनी नागपुरात येऊन संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट संघाकडून गुप्त ठेवण्यात आली होती. याअगोदर २८ डिसेंबर २०१६ रोजी टाटा यांनी अचानकपणे संघ मुख्यालयाला भेट दिली होती. शिवाय मुंबईतदेखील एका कार्यक्रमात रतन टाटा हे सरसंघचालकांसमवेत एकाच मंचावर उपस्थित होते.
तृतीय वर्ष वर्ग असतो ‘खास’
संघाच्या प्रणालीत तृतीय वर्ष वर्गाचे महत्त्वाचे स्थान असते. दरवर्षी रेशीमबागला होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती असते. मागील वर्षी प्रणव मुखर्जी यांच्या येण्याने संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे लागले होते. २०१७ साली नेपाळचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल रुक्मांगुद कटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याअगोदर कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे.