सलवतीच्या दरातील रेशनही आता वर्षभर मोफत; केंद्राचा मोठा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 09:36 PM2023-01-02T21:36:12+5:302023-01-02T21:37:10+5:30
Nagpur News रेशन दुकानातून सवलतीच्या दरात मिळणारे धान्य वितरण आता मोफत होणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्णय घेतला असून १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत रेशनचे धाान्य मोफत देण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
नागपूर : रेशन दुकानातून सवलतीच्या दरात मिळणारे धान्य वितरण आता मोफत होणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्णय घेतला असून १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत रेशनचे धाान्य मोफत देण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना सवलतीच्या दरात धान्य वितरित केले जाते. रेशन दुकानातून अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना गहू २ रुपये किलो या प्रमाणे तर ३ रुपये किलो याप्रमाणे तांदूळ वितरित केले जाते. तसेच भरड धान्य हे १ रुपये किलो या दराने दिले जाते. कोरोना काळात या सलवतीच्या धान्यव्यतिरिक्त केंद्र सरकारने मोफत धान्य वितरित केले. जवळपास दीड ते पावणेदोन वर्ष हे धान्य मोफत मिळाले. कोरोनाचा काळात गरिबांना याचा मोठा आधार मिळाला. आता ही योजना बंद झाली आहे. मात्र केंद्र सरकारने एक पाऊल पुढे जाऊन सवलतीच्या दरात मिळणारे धान्यच मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारलाही यासंदर्भातील आदेश मिळाले असू राज्य सरकारने अन्न पुरवठा विभागाला यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. त्या माध्यमातून सर्व रेशन दुकानांना हे आदेश पाठवले जात आहे. त्यामुळे जानेवारीपासून आता रेशनकार्डवरील प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना रेशन सवलतीच्या दरात नव्हे तर मोफत मिळेल.
- मागच्या महिन्यातील धान्यही मोफत मिळणार
अनेक जिल्ह्यांमध्ये विविध तांत्रिक कारणांमुळे दोन ते तीन महिन्याचे धान्य वितरित करता येऊ शकले नाही. अशा वेळी पुढच्या महिन्यात धान्य घेण्यासाठी मुदतवाढ मिळत असते. परंतु आता मागची उचल झाली नसेल तर त्यांना जानेवारीमध्ये मिळणारे मागचे धान्य मोफत द्यावे लागणार आहे.