आता मनोरुग्णांनाही रेशन कार्डचा ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:40+5:302021-08-01T04:07:40+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : बरे होऊनही मनोरुग्णाचा शिक्का बसल्यामुळे अनेकांवर मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीच्या आत जगण्याची वेळ आली आहे. नाउमेद ...

Ration card 'Aadhaar' for psychiatrists now | आता मनोरुग्णांनाही रेशन कार्डचा ‘आधार’

आता मनोरुग्णांनाही रेशन कार्डचा ‘आधार’

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : बरे होऊनही मनोरुग्णाचा शिक्का बसल्यामुळे अनेकांवर मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीच्या आत जगण्याची वेळ आली आहे. नाउमेद झालेल्यांमध्ये जगण्याची उमेद जागविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने प्रयत्न चालविले आहे. स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देत त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे. शासानाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ८० जणांना लवकरच रेशन कार्डचा आधार मिळणार आहे.

परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू होता. अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. अनेक वर्षांच्या उपचारानंतर ते बरे झाले. आता आपले कुटुंबीय येतील, हात धरून घरी नेतील आणि उर्वरित जीवन कुटुंबीयांसह सुखासमाधानात आनंदाने जगायला मिळेल, अशी स्वप्नेही त्यांनी रंगविली. मात्र, समजदारांच्या मतलबी दुनियेचे वास्तव दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या लक्षात आले. प्रादेशिक मनोरुग्णालयात असे बरे झालेले २६५ रुग्ण आहेत. टाटा ट्रस्टच्या मदतीने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहे. याचे पहिले पाऊल म्हणून यातील १५३ जणांचे आधार कार्ड काढून त्यांना स्वत:ची ओळख दिली. उर्वरित ११२ जणांना पुढील आठवड्यात आधार कार्ड दिले जाणार आहे. स्वयंरोजगाराचे शिक्षण पूर्ण होऊन त्यात निपुण झालेल्या ८० जणांना रेशन कार्ड दिले जाणार आहे. यासाठी त्यांचे अर्ज भरून प्रशासनाकडे पाठविण्यातही आले आहे.

- ग्रीटिंग, लिफाफा, फाईल, मेणबत्तीचे प्रशिक्षण

मनोरुग्णालयातील साचेबंद वातावरणातून बाहेर पडणाऱ्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी ग्रीटिंग, लिफाफा, फाईल, मेणबत्ती आदी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने विविध सामाजिक संघटनेच्या मार्फत त्यांच्या हाताला काम दिले जाणार आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्डची मोठी मदत त्यांना मिळणार आहे.

-आधारसोबतच रेशन कार्ड

उपचारातून बरे झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना नवी ओळख देत आधार कार्ड दिले जात आहे. रुग्णालयाबाहेर जीवन जगताना शासनाच्या निराधार योजनेसह इतरही योजनांचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्डही काढून दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ८० लोकांचे अर्ज भरून प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

Web Title: Ration card 'Aadhaar' for psychiatrists now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.