शिधापत्रिकाधारकांना आता डाळही मिळणार फुकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:40 PM2020-05-09T21:40:48+5:302020-05-09T21:43:19+5:30
रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प्रत्येक कार्डवर १ किलो डाळही नि:शुल्क मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प्रत्येक कार्डवर १ किलो डाळही नि:शुल्क मिळणार आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत १ एप्रिलपासून प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यातील बीपीएल, अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना १७ हजार ९६७.६ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. पण मे महिन्याच्या पुरवठ्यात शासनाकडून रेशन दुकानांना गहू व तांदूळ पुरवठा झाला, डाळ मात्र देण्यात आली नाही, त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना डाळ मिळत नसल्याची ओरड होत होती. पण यासंदर्भात विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार डाळही नि:शुल्क देणार आहे. नागपूर शहरात ६ झोन आहे. यातील ३ झोनमध्ये तूरडाळ व ३ झोनमध्ये चना डाळ उपलब्ध झाली आहे. शिधापत्रिकाधारकांना ही डाळ नि:शुल्क देण्यात येणार आहे. ज्या झोनमध्ये यंदा चना डाळ आली, पुढच्या महिन्यात त्या झोनला तूरडाळ उपलब्ध होणार आहे.
नागपूर शहरात एकूण ६६५ रेशन दुकाने असून, ३ लाखांवर कार्डधारक आहेत. ५५ रुपये किलोप्रमाणे रेशन दुकानात केशरी व बीपीएल कार्डधारकांना एक किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येते. शहराला महिन्याला ६६७ मेट्रिक टन डाळीची गरज असते.
सरकारने या महिन्यात डाळीचे पैसे घेतलेले नाहीत. मात्र डाळीचा पुरवठा केला. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क द्यायची आहे. प्रति व्यक्ती ५ किलो नि:शुल्क तांदळासोबत प्रति कार्डधारकांना १ किलो तूरडाळ नि:शुल्क मिळणार आहे. त्यामुळे कार्डधारकांनी डाळीचे पैसे रेशन दुकानदारांना देऊ नयेत व रेशन दुकानदारांनी डाळीचे पैसे कार्डधारकांकडून घेऊ नये.
संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटना