नागपुरात रेशनचे वितरण पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 09:08 PM2020-08-17T21:08:44+5:302020-08-17T21:10:04+5:30
सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यानंतर गरिबांना जिवंत ठेवण्याचे काम रेशन दुकानदारांनी केले. त्यामुळे रेशन दुकानदारांना कोविड योद्धा घोषित करून ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी संघटना लॉकडाऊनपासून करीत आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यानंतर गरिबांना जिवंत ठेवण्याचे काम रेशन दुकानदारांनी केले. त्यामुळे रेशन दुकानदारांना कोविड योद्धा घोषित करून ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी संघटना लॉकडाऊनपासून करीत आली आहे. पण सरकारने काही मान्य केले नाही. अखेर रेशन दुकानदाराचा कोरोनाने पहिला बळी गेला आहे. त्याचबरोबर अनेकजण पॉझिटिव्ह निघाले आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनांनी रेशनचे वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतवारी झोनमधील प्रसिद्ध रेशन दुकानदार हसमुखभाई सागलानी यांचे कोरोनाने निधन झाल्याचे रेशन दुकानदार संघटनेने कळविले आहे. ते सतत कार्डधारकांच्या संपर्कात पॉस मशीनवर शिधापत्रिकाधारकाचे अंगठे घेत असल्याने त्यांना लागण झाली. शासनाने ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनवर अंगठा (फिंगर) लावल्यावरच धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता बळावण्याची भीती रेशन दुकानदारांना होती. त्यांनी शासनापुढे विरोधही दर्शविला होता. परंतु शासनाकडून कुठलाही निर्णय न घेण्यात आल्याने रेशन दुकानदारांनी पुन्हा वितरण सुरू केले. परंतु सोमवारी एका दुकानदाराचा मृत्यू झाल्यामुळे व काही दुकानदार पॉझिटिव्ह निघाल्यामुळे वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेशन दुकानदार लॉकडाऊनच्या काळात आपली सेवा देत आला आहे. त्याच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने ५० लाख रुपयांचे रेशन दुकानदारांना सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी विदर्भ रास्तभाव दुकानदार केरोसिन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.