नागपुरात रेशन वाटप बंद, दुकानदारांनी पुकारला संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 08:57 PM2020-06-01T20:57:29+5:302020-06-01T20:59:19+5:30
कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपासून राज्यभरात संप पुकारत रेशन वितरण बंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपासून राज्यभरात संप पुकारत रेशन वितरण बंद केले आहे.
डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्यासह रेशन दुकानदारही कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही कोविड योद्धा घोषित करून प्रत्येक रेशन दुकानदाराला ५० लाख रुपयांचा विमा मिळावा. रेशन दुकानदारांचे कमिशन खूप कमी आहे. तेव्हा त्यांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधन देण्यात यावे, ई-पॉस मशीनमध्ये दर महिन्याला बिघाड होतो. त्यामुळे सर्व्हर, नेटची समस्या दूर करावी. कोरोनाचे संकट संपेपर्यंत रेशन दुकानदार किंवा ग्राहकांचे थम्ब घेण्यात येऊ नये आणि प्रति कार्डधारकांना ४ लिटर केरोसिन देण्यात यावे, अशा मागण्या रेशन दुकानदारांनी केल्या आहेत. या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा १ जून पासून रेशन वितरण बंद केले जाईल, असा इशाराही यापूर्वीच देण्यात आला होता. याअंतर्गत आज सोमवारी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला. नागपुरात विदर्भ रास्त भाव दुकानदार केरोसीन विक्रेता संघटनेच्या बॅनरअंतर्गत अन्नपुरवठा अधिकारी अनिल सवई यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विभागाबाहेर मागण्यांकडे लक्ष वेधत धरणे दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उमाशंकर अग्रवाल, प्रफुल्ल भुरा, रितेश अग्रवाल, सुनील जैस, मिलिंद सोनटक्के, राजेश कामडे, सुभाष मुसळे आदी उपस्थित होते.
गरीब-गरजूंना फटका
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे गरिबांचे जगणे कठीण झाले होते. ते उपाशी राहू नये म्हणून शासनाने त्यांना तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एप्रिल व मे महिन्याचे धान्य वाटप झाले. जून महिन्याचे वाटप व्हायचे आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आणि त्यांचा संप हा सुरूच राहिला तर गरीब-गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.