रेशनच्या धान्याची खूल्या बाजारात विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:38+5:302021-08-28T04:12:38+5:30
श्याम नाडेकर नरखेड: केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले ...
श्याम नाडेकर
नरखेड: केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. देशातील शेवटचा माणूस भुकेला राहू नये, त्याला दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून या योजना सुरू करण्यात आल्या. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. यासाठी अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील कुटुंबाना २० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या योजनेतील जवळपास ५० टक्के धान्य थेट बाजारात विकले जात असल्याचे आढळून येत आहे.
अन्न सुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. त्यात गहू २ रुपये व तांदूळ ३ रुपये प्रति किलो याप्रमाणे व प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. अंत्योदय योजनेत ३५ किलो धान्य दिले जाते. प्रधानमंत्री अन्न योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. चार जणांच्या कुटुंबीयांना अंत्योदय योजनेत ५५ किलो धान्य व अन्नसुरक्षा योजनेत ४० किलो धान्य मिळते.
ग्रामीण भागातील ७५ टक्के कुटुंबाना स्वस्त धान्य दुकानातून दरमहा धान्य पुरविल्या जाते. स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटपात हेराफेरी करतात असा आरोप होता. आता लाभार्थ्याला प्रत्यक्ष दुकानात जाऊन यंत्रावर ठसा उमटवावा लागतो. त्यामुळे दुकानदारांना हेराफेरी करण्यास वाव नाही. मुळात कुटुंबाच्या गरजेपेक्षा मोफत व विकत दिले जाणारे धान्य अधिकचे मिळते. दोन वेळचे भरपेट जेवण घेतले तरी ५० टक्के धान्य वापरले जात नाही. त्यामुळे हे धान्य बाजारपेठेत विकल्या जाते.
स्वस्त धान्य दुकानातील आलेल्या धान्याचे वितरण करण्यास किमान चारपाच दिवस लागतात. वितरण झाल्यानंतर लहान व्यापारी गावखेड्यात सक्रिय होऊन लाभार्थ्यांकडून धान्य खरेदी करतात. ते तालुकास्तरावर गोळा करून विकल्या जाते. तालुकास्तरावरील व्यापारी हे धान्य मोठ्यामोठया ट्रकमध्ये लोड करून नागपूर व मध्य प्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्याकडे पाठवितात.
दोन रुपये किलोने खरेदी केलेल्या गव्हाला आठ ते दहा रुपये व तीन रुपये किलोने खरेदी केलेल्या तांदळाला दहा ते बारा रुपये भाव देऊन लाभार्थ्यांकडून खरेदी केल्या जाते व नफा कमावून ते धान्य खुल्या बाजारात आणल्या जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही.
नरखेड तालुक्यात अंत्योदय योजनेत ८ हजार ४३९ कार्डधारक व ३४ हजार १२४ लाभार्थी आहेत. अन्न सुरक्षा योजनेत २० हजार ८७ कार्डधारक व ९०हजार ६४४ लाभार्थी आहेत. केसरी कार्डधारकांची संख्या ४ हजार ८२१ आहे. तालुक्यात एकूण ३४ हजार ६५ शिधापत्रिकाधारक असून १ लाख ५० हजार ५४६ लाभार्थी आहेत.
---
ज्यांची परिस्थिती व उत्पन्न चांगले आहे अशानाही धान्य मिळते. सधन कुटुंबे रेशनचे धान्य खात नाही. तसेच गहू ,तांदूळ गरजेपेक्षा जास्त लाभार्थ्याला मिळतो त्यामुळे खुल्या बाजारात ते विकतात. सरकारने गहू तांदूळ देण्यापेक्षा इतर धान्य दिल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो.
सुरेश बारई
अध्यक्ष, नरखेड, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना
---
योजनेतील धान्य जर लाभार्थी खुल्या बाजारात विकताना आढळला तर त्यांचे रेशनकार्ड तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. याबाबत प्रत्येक गावात दवंडी देऊन सूचना देण्यात आल्या आहे.
कमलेश कुंभरे
निरीक्षण अधिकारी, उपविभाग, काटोल.