नागपुरातील गरीबांच्या घरचे ‘रेशन’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:07 AM2020-09-09T01:07:52+5:302020-09-09T01:09:30+5:30
रेशन दुकानदार मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सकाळी रेशनची दुकाने सुरू होती. परंतु रेशन दुकानदार संघाने संपाची घोषणा केल्यानंतर सर्व रेशन दुकानांना कुलूप लावण्यात आले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्याचे धान्य कार्डधारकांना मिळाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशन दुकानदार मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सकाळी रेशनची दुकाने सुरू होती. परंतु रेशन दुकानदार संघाने संपाची घोषणा केल्यानंतर सर्व रेशन दुकानांना कुलूप लावण्यात आले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्याचे धान्य कार्डधारकांना मिळाले नाही. अशात रेशन दुकानदार संपावर गेल्याने कार्डधारकांना नियमित धान्य मिळणार नाही.गेल्या काही महिन्यापासून धान्य वितरण प्रक्रियेत पॉस मशीनचा विरोध दुकानदारांकडून होत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागालाही त्यांनी वेळोवेळी निवेदने दिली आहे. पण दखल घेतली नाही.
आजच्या घडीला शहरात ४० दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह तर दोन दुकानदारांचा मृत्यू झाल्याचे रेशन दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सरकारने ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण केले. पण ऑगस्ट महिन्यापासून सरकारने पुन्हा आॅनलाईन पद्धत लागू केली. ऑनलाईन धान्य वितरण बंद करण्याच्या मागणीसाठी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन पुणे यांनी १ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. परंतु नागपुरातील रेशन दुकानदारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. प्रक्रिया न्यायालयात असल्यामुळे नागपुरातील रेशन दुकानदार संपात सहभागी झाले नाही. परंतु आता संघटनेने रेशन दुकानदारांना संप पुकारण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया बंद होणार नाही, तोपर्यंत रेशन दुकान बंद ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला असून, अन्न व नागरी पुरवठा विभागालाही निवेदन देण्यात आले आहे.
३.५० लाख रेशन कार्डधारक अडचणीत
रेशन दुकानदार संघाच्यानुसार शहरात किमान ३.५० लाख रेशन कार्डधारक आहे. जे सरकारी धान्य घेऊन जातात. संपामुळे या कार्डधारकांना धान्य मिळू शकणार नाही.
ऑनलाईनमुळे संक्रमण वाढेल
ऑनलाईनमुळे सुरक्षित अंतराचे पालन करता येत नाही. बहुतांश कार्डधारकांचा हात पकडून पॉस मशीनवर अंगठा लावावा लागतो. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे. सद्यपरिस्थितीत शहरात ४० रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
गुड्डू अग्रवाल,
अध्यक्ष, रेशन दुकानदार संघ