स्वस्त धान्य दुकान : गहू आला तर डाळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:14 PM2021-05-04T23:14:22+5:302021-05-04T23:16:11+5:30
Ration Shop:सरकारी स्वस्त धान्य दुकानात (रेशन दुकान) जणू धान्याचे दोनच पर्याय ठेवण्याचे निर्बंध आहेत, अशी स्थिती आहे. तांदळासह कधी गहू दिला जातो तर कधी मका. धान्याची गुणवत्ता तर कधीच चांगली नसते. यावेळी तांदळासोबत गहू दिला जात असला तरी डाळ आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी स्वस्त धान्य दुकानात (रेशन दुकान) जणू धान्याचे दोनच पर्याय ठेवण्याचे निर्बंध आहेत, अशी स्थिती आहे. तांदळासह कधी गहू दिला जातो तर कधी मका. धान्याची गुणवत्ता तर कधीच चांगली नसते. यावेळी तांदळासोबत गहू दिला जात असला तरी डाळ आलेली नाही. गेल्या महिन्यात शासनाकडून मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु संबंधित विभागात नेहमीप्रमाणे दिरंगाईचे क्रम सुरू राहिले. पीओएस मशीनमध्ये धान्याचे अपलोडींग उशिराने झाले आणि संपूर्ण प्रक्रियेला उशीर झाला. खरे तर धान्याच्या पुरवठ्याला अत्यावश्यक सेवा समजून विभागाने गांभीर्य दाखवायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. आधी रेशन दुकानातून तुरीची डाळ मिळत होती; परंतु काही महिन्यांपासून मिळणारी डाळ अत्यंत निम्न प्रतिची आहे. चणा डाळ उपलब्ध करवून देण्यात विभाग कमकुवत ठरत आहे. लाखो कार्डधारकांना सद्य:स्थितीत सरकारी धान्याची गरज आहे; परंतु त्यांना केवळ तांदूळ आणि गव्हावरच गुजराण करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या गरजेशी संबंधित या बाबीकडे आपल्या पोळ्या शेकणाऱ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ताही मौन धारण करून आहेत. संकटाच्या या काळात धान्याचे पर्याय उपलब्ध करवून देण्यावर भर दिला जात नसल्याचे दिसून येते.