नागपूर जिल्ह्यातील बोखारा येथे झाडाखालीच भरते रेशन दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:01 AM2018-06-19T11:01:40+5:302018-06-19T11:01:49+5:30
कोरडीजवळील बोखारा वसाहतीतील स्वस्त धान्याची विक्री, वाटप चक्क झाडाखाली केले जात असून कित्येक महिन्यांपासून लाभधारक उन्हाळा-पावसाळ्याच्या दिवसात वेदना सहन करीत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.
दिनकर ठवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरडीजवळील बोखारा वसाहतीतील स्वस्त धान्याची विक्री, वाटप चक्क झाडाखाली केले जात असून कित्येक महिन्यांपासून लाभधारक उन्हाळा-पावसाळ्याच्या दिवसात वेदना सहन करीत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. मोजक्याच दिवशी स्वस्त धान्याचे वाटप केले जात असल्याने जागेअभावी लाभधारकांना ताटकळत तासन्तास उभेच राहावे लागते. रेशन दुकानदार कसेबसे झाडाखाली आपले कार्यालय थाटतात. याच ठिकाणी धान्य वाटप केले जाते. स्थानिक दुकानदार नसल्याने होणारी गैरसोयदेखील लाभधारकांना सहन करावा लागत आहे. ही बोखारा येथील रेशन लाभधारकांची व्यथा आहे. आश्चर्य म्हणजे, पुरवठा विभागाने या व्यथेची अद्यापही दखल घेतलेली नाही.
बोखारा येथील रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य पुरविण्याची जबाबदारी गोधनी येथील राऊत नावाच्या रेशन दुकानधारकाकडे होती. काही महिन्यांपूर्वी राऊत यांना धान्य वाटपाच्या गैरव्यवहारावरून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर बोखारा येथील स्वस्त धान्य वाटपाची जबाबदारी लोणारा येथील स्वस्त धान्य दुकानधारक ताराचंद कापसे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
धान्याच्या अफरातफरीच्या कारवाईनंतर धान्य वाटपाची जबाबदारी ताराचंद कापसे यांच्याकडे आली. बोखाऱ्यात सोईस्कर जागाच मिळत नसल्याचे कापसे यांचे म्हणणे आहे.
त्यांनी गावाच्या बाहेर शेतात असलेली एक खोली धान्य साठविण्यासाठी घेतली. यात शेतात असलेल्या एका झाडाखाली खुर्च्या टाकून तात्पुरते कार्यालय थाटले जाते. याचठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करीत लाभधारक उभे असतात. कापसे यांच्याकडे बोखाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते केवळ आठवड्यातून दोनच दिवस धान्य वाटप करतात. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी दिसून येते. ठराविक दिवशी लाभधारकांना आपली मजुरी गमावून रेशन धान्याची प्रतीक्षा करावी लागते.