रेशन दुकानदारांच्या संपाचा शिधापत्रिकाधारकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:25 PM2020-06-05T21:25:20+5:302020-06-05T21:27:12+5:30
रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतो आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने गेल्या अडीच महिन्यापासून देशात लॉकडाऊन केले होते. यामुळे अनेकांचे रोजगार ठप्प पडल्याने रेशनवरील धान्य फार मदतीचे ठरले. अशा संकटाच्या परिस्थितीत कुणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून कार्यरत होते. परंतु शासनाकडून त्यांची दखलही घेतल्या गेली नाही, अशी खंत व्यक्त करुन आम्हालाही ‘कोविड योद्धा’ म्हणून घोषित करा यासह प्रत्येक रेशन दुकानदाराचा ५० लाख रुपयांचा विमा काढा, अशा विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला. रेशन दुकानदारांच्या मागण्या शासनाला मान्य नसल्याने, शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही ठोस निर्णय घेतला नाही. जून महिन्याचा धान्याचा पुरवठा दुकानांमध्ये पोहचला असून, दुकानदारांनी जूनचे धान्य वितरण करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गरीब शिधापत्रिकाधारकांचे चांगलेच वांधे झाले आहेत.
रेशन दुकानदारांच्या संपाबाबत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई यांना विचारले असता, ते म्हणाले की, रेशन दुकानांमध्ये शासनाकडून धान्य पुरवठा सुरू आहे आणि शिधापत्रिका धारकांनाही धान्याचे वितरण करण्यात येत आहे.
दुकाने सुरू असली तरी, जोवर शासन रेशन दुकानदारांना विमा सुरक्षा देत नाही, तोवर धान्य वितरण करणार नाही.
संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्तभाव केरोसीन विक्रेता संघटना