रेशन दुकान होताहेत टार्गेट : संरक्षण न मिळाल्यास १ मेपासून धान्य वाटप बंद करण्याचा दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:58 PM2020-04-23T22:58:27+5:302020-04-23T22:59:16+5:30
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत.रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत. पण काही लोकांकडून रेशन दुकानदारांना टार्गेट केले जात आहे. मिळत असलेल्या धमकी व शिवीगाळ यामुळे रेशन दुकानदार त्रस्त झाले आहेत. रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
रेशन दुकानदारांना नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, गल्लीतील गुंड यांच्याकडूनही त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. लोकांना धान्य वाटप करण्यासाठी दुकानदारांकडून धान्याचे पोते मागत असल्याचाही आरोप रेशन दुकानदारांचा आहे. त्यांना विरोध केल्यास खोट्या तक्रारी, नाहक बदनामी व ब्लॅकमेलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पारडी येथील एका रेशन दुकानदाराला नगरसेवकाने धमकी दिल्याची तक्रार त्याने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ओम गणेश को-ऑप. सोसायटीतर्फे संचालित रेशन दुकानदारानेसुद्धा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली आहे. ओमनगर कोराडी येथील माया धान्य भंडारच्या संचालकाने तक्रार केली आहे. दीक्षा महिला बचत गटातर्फे संचालित रेशन दुकानातर्फेसुद्धा कार्डधारकाने जबरदस्ती केल्याची तक्रार केली आहे. सदर येथील प्रकाश किराणा भंडार या रेशन दुकानदाराने गर्दी करू नका असे म्हटल्यावर लोकांनी शिवीगाळ करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावल्याची तक्रार केली आहे. रेशन दुकानदारांच्या दररोज तक्रारी वाढल्या आहेत.
दुकानांना संरक्षण प्रदान करावे
आमच्या विरोधात होत असलेल्या अपप्रचारामुळे रेशन दुकानदारांचे मनोबल खचले आहे. पुरवठा विभाग सक्षम असूनसुद्धा त्यांच्याकडे तक्रार न करता विविध माध्यमातून रास्त भाव दुकानदारांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. धान्य वितरण करण्यात बाधा निर्माण होत असल्यामुळे, मानसिक तणावामुळे धान्य वितरण करणे रेशन दुकानदारांना शक्य होणार नाही. होत असलेल्या घटनेची शासनाने दखल घ्यावी, दुकानदारांना संरक्षण प्रदान करावे, अशी मागणी रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे.