रत्नाकर गुट्टेने केला साडेपाच हजार कोटींचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 08:49 PM2018-07-17T20:49:33+5:302018-07-17T21:01:47+5:30
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांंना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला . गुट्टे यांची छोटा नीरव मोदी अशी तुलना करत त्यांना अटक करण्याची मागणी मुंडे यांनी केली .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांंना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला . गुट्टे यांची छोटा नीरव मोदी अशी तुलना करत त्यांना अटक करण्याची मागणी मुंडे यांनी केली .
मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला
रत्नाकर गुट्टे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण २२ कंपन्या नोंदणीकृत असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर आहेत . या माध्यमातून गुट्टेने बँकांकडून कर्ज काढले आहे . गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने 'हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट' या योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांंच्या नावे कर्जे उचलली. यापोटी शेतकऱ्यांंना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावली. कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करुनदेखील कारखान्याने या रकमा बँकांना परत केल्या नाही. परिणामी आता शेतकऱ्यांंना २० ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा येत असल्याचा दावा मुंडे यांनी केला. यावेळी मुंडे यांनी गुट्टे यांच्या विविध आठ कंपन्या आणि त्यांनी घेतलेली कर्जे याची आकडेवारी सभागृहात सादर केली. गुट्टे यांनी १८५ बँका, पतसंस्था यांना गंडा घातल्याचा आरोप त्यांनी केला .
शून्य उलाढाल, कर्ज हजारो कोटींची
गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांवर शून्य उलाढाल असतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे साडेतीन ते साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जे घेतली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले . एका कंपनीच्या नावे कर्ज घेऊन ती रक्कम दुसऱ्या कंपनीला कर्ज म्हणून दिली. हा व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या परवान्याशिवाय झाला असून यात 'बँकिंग रेग्युलेशन अँक्ट'मधील तरतुदीचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला .
तर गुट्टे देश सोडून जाईल
गुंतवणूकदारांचे पैसे थकविल्याच्या प्रकरणात 'डीएसके' समूहाचे डी.एस.कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबांना अटक करण्यात आली . गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी याहून गंभीर गुन्हे दाखल झाले होते , मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही . त्यांना सत्तापक्षाची मदत होत आहे. जर गुट्टे यांना ताब्यात घेतले नाही तर ते विदेशात पळून जाण्याचा धोका आहे, असेदेखील मुंडे यांनी म्हटले .त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी त्यांनी केली .
सरकारने चौकशी करावी
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव नाकारला . मात्र हा विषय गंभीर असून गुट्टे ला अटक का होत नाही ते सरकारने स्पष्ट करावे. तसेच ६ ते ७ महिन्यात चौकशी पूर्ण होईल अशी व्यवस्था करण्याचे त्यांनी निर्देश दिले . या प्रकरणामुळे बँकिंग प्रणाली बुडण्याचा धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .
गुट्टेने या कंपन्यांच्या नावे घेतले कर्ज
कंपनी कर्ज (कोटींमध्ये)
गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी लि. १४६६.४४
सुनील हायटेक इंजिनिअरींग लि. २४१३.३२
गंगाखेड सोलर प्रा.लि. ६५५.७८
गुट्टे इन्फ्रा प्रा.लि. ११८.५०
सीम इंडस्ट्रीज लि. ८६.६५
व्हीएजी बिल्टेक प्रा.लि. ३५.००
व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन ३१.०६
योगेश्वरी हॅचरीज प्रा.लि. ६५५.७८
एकूण ५४६२.४३