हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये वाढली ‘रौनक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:36+5:302021-08-22T04:11:36+5:30
नागपूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशानुसार १६ ऑगस्टपासून हॉटेल व रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत सुरू आहेत. ...
नागपूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशानुसार १६ ऑगस्टपासून हॉटेल व रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत सुरू आहेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या व्यवसायात आलेली मरगळ दूर झाली असून, आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये ‘रौनक’ पाहायला मिळत आहे. या व्यवसायावर लावलेली ५० टक्के ग्राहक उपस्थितीचे बंधन काढून टाकावे, असे हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर हॉटेल व रेस्टॉरंट तब्बल आठ महिने बंद होते. ५० टक्के उपस्थितीच्या सक्तीनंतर दिवाळीत सुरू झाले. पण, कोरोनाची भीती लोकांमध्ये असल्याने हॉटेल व रेस्टॉरंटला ग्राहक मिळत नव्हते. त्यानंतर या व्यवसायाला गती मिळू लागल्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे या व्यवसायावर लॉकडाऊनचे संकट आले आणि आर्थिक व्यवहार बंद झाले. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर या व्यवसायावर दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन टाकले. अन्य दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू असताना हॉटेल व रेस्टॉरंट दुपारी ४ पर्यंतच सुरू ठेवले. वेळ वाढविण्यासाठी राज्यातील सर्व हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनला आंदोलन करावे लागले, शिवाय मुुंबईतील असोसिएशनने एकत्रितरीत्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. राज्य सरकारने याकडेही दुर्लक्ष केले. अखेर १६ ऑगस्टपासून रात्री १० पर्यंत हा व्यवसाय सुरू झाल्याने सध्यातरी ग्राहकांच्या उपस्थितीने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकही कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये येत असल्याचे असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले.
रात्री ११ पर्यंत परवानगी द्या
राज्य सरकारच्या आदेशानुसार लहान-मोठे रेस्टॉरंट, बेकरी रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण ५० टक्के ग्राहकांच्या बंधनामुळे हॉटेल व रेस्टॉरंट मालकांना अजूनही आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मनपाचे पथक येऊन तपासणी करतात आणि दंड ठोठावतात. ग्राहकांना सेवा देणे आमचे काम आहे. नियमानुसार बैठकीची व्यवस्था केली आहे. आता लोक घरातून कुटुंबीयांसह बाहेर निघत आहेत. त्यामुळे गर्दी वाढली आहे. पूर्वी झालेला आर्थिक तोटा भरून काढण्याची संधी आहे. ग्राहक रात्री आठ वा नऊनंतर घराबाहेर निघतात. त्यामुळे या व्यवसायाला रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.
अमित बाम्बी, अध्यक्ष, नागपूर ईटरी ओनर्स असोसिएशन.