नागपूरचा रौनक साधवानी बनला ‘नंबर वन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 02:30 PM2021-11-09T14:30:38+5:302021-11-09T14:42:37+5:30
१६ वर्षे गटाच्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत प्रथम स्थान प्राप्त करत ऑरेंज सिटीचा पहिला ग्रँडमास्टर होण्याचा मान रौनक साधवानीने प्राप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑरेंज सिटीचा पहिला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळविणारा रौनक साधवानी हा १६ वर्षे गटातील जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत नंबर वन खेळाडू ठरला आहे. रौनकने लाटव्हियातील रिगा येथे २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या गेलेल्या फिडे ग्रँडस्वीस स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत आपल्या गटात यशस्वी झेप घेतली.
फिडेने जाहीर केलेल्या यादीत रौनकचे सध्याचे रेटिंग २६१६ आहे. जगातील अनेक दिग्गजांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत रौनकला फिडेने राइल्ड कार्ड प्रवेश दिला होता. २०१९ ला ब्रिटनमध्ये झालेल्या फिडे स्पर्धेत रौनकने ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळविला. २०२१ ला अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
रौनकने रविवारी संपलेल्या ११ फेऱ्यांच्या स्पर्धेत तीन विजय आणि तीन पराभवांसह साडेपाच गुणांची कमाई केली. पाच सामन्यांत गुणविभागणी झाली. रौनकने पाचव्या फेरीत रशियाचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर रखमानोव्हला पराभूत केले. सहाव्या फेरीत त्याने आपलाच सहकारी डी. गुकेशवर आणि नवव्या फेरीत रशियाचा प्रख्यात ग्रँडमास्टर ड्रीव्ह ॲलेक्सेवर मात केली. दुसऱ्या, सातव्या आणि दहाव्या फेरीत मात्र रौनकला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
‘जगातील ख्यातमान खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी लाभली, हे माझे भाग्य समजतो. दररोज अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अशा लढतींना ५ ते ६ तास सामोरे जावे लागले. या कामगिरीवर समाधानी आहे. या स्पर्धेने मला प्रचंड आत्मविश्वास आणि अनुभव दिला. माझ्यासाठी हा अभूतपूर्व क्षण म्हणावा लागेल. १६ वर्षे गटाच्या जागतिक क्रमवारीत नंबर वन बनलो याचा अभिमान वाटत असला तरी हे पुरेसे नाही. यापेक्षा मोठी कामगिरी करण्याची जिद्द कायम आहे. माझ्या क्षमतेवर प्रचंड विश्वास बाळगणाऱ्या आई-वडिलांचा मी आभारी आहे.’
- रौनक साधवानी, ग्रँडमास्टर