राऊत कान टोचून गेले, पण शिवसेनेतील गटबाजीचा बाण ताणलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 09:50 PM2022-04-07T21:50:39+5:302022-04-07T21:51:12+5:30
Nagpur News दोन आठवड्यापूर्वीच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी नागपुरात येत आढावा घेऊन कान टोचले. मात्र, त्यानंतरही गुरुवारी राऊत यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात गटबाजीचा बाण ताणल्या गेला.
नागपूर : बलाढ्य भाजपशी सामना करण्याचे मनसुबे आखणाऱ्या शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. नागपुरात दोन महानगर प्रमुख नेमल्यानंतर पक्षात उभे दोन गट पडले आहेत. दोन आठवड्यापूर्वीच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी नागपुरात येत आढावा घेऊन कान टोचले. मात्र, त्यानंतरही गुरुवारी राऊत यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात गटबाजीचा बाण ताणल्या गेला. दोन महानगर प्रमुखांच्या उपस्थितीत दोन वेगवेगळी आंदोलने झाली.
बुधवारी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत देशपांडे सभागृहात युवा संमेलन झाले. त्यात महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे उपस्थित नव्हते. यामुळे पक्षात धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेला बळ मिळाले. गुरुवारी किशोर कुमेरिया यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ संविधान चौकात दुपारीच आंदोलन उरकून घेतले. त्यानंतर सायंकाळी त्याच चौकात प्रमोद मानमोडे यांच्या उपस्थितीत दुसरे आंदोलन झाले. सायंकाळी झालेल्या आंदोलनात शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, सुरेश साखरे, जयदीप पेंडेकर, प्रवीण बरडे, विशाल बरबटे, किशोर पराते, सतीश हरडे आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांना निवेदन
संविधान चौकात आंदोलन केल्यानंतर किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना निवेदन देत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. किशोर पराते, प्रवीण बरडे, सतीश हरडे ही नेतेमंडळी यावेळीही उपस्थित होती.