कस्तूरचंद पार्कवरच रावण दहन, हेरिटेज कमिटीने दिली चार अटींवर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:36 PM2017-09-05T23:36:00+5:302017-09-05T23:36:44+5:30
शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित करता येणार आहे. हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली.
नागपूर, दि. 5 - शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित करता येणार आहे. हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली. अध्यक्षस्थानी नीरी चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती होते. कमिटीचे सदस्य पी.एस. पाटनकर, उज्ज्वला चक्रदेव, सुप्रिया थूल, अशोक मोखा यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होेते. हेरिटेज कमिटीने कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाची परवानगी देताना आयोजकांना चार अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन घातले.
कमिटीचे सदस्य अशोक मोखा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हेरीटेज कमिटी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विरोधात नाही. सांस्कृतिक कार्यक्रम देखील हेरिटेजचाच एक भाग आहे, असे आमचे मानने आहे. विशेषत: जे सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षाापासून सुरू आहेत व ते शहराची ऐतिहासिक परंपरा बनले आहेत, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मार्ग काढण्याचीच कमिटीची भूमिका आहे. कमिटीने रावण दहनाची परवानगी दिली. आता आयोजकांनी अटींचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अशा आहेत अटी
- कस्तूरचंद पार्कच्या मध्य भागात असलेले स्मारक ज्याला बारादरी असे संबोधले जाते, ते जीर्ण होत आहे. त्यामुळे या कुणी स्पर्श करू नये याची काळजी घ्यावी. यासाठी या स्मारकापासून २० फूट अंतरावर सुरक्षा कवच उभारावे लागेल.
- कार्यक्रमाच्या आयोजनावेळी केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जाईल. चारचाकी वाहनांमुळे मैदानातील माती खालवर होते व त्यामुळे मैदानाचे नुकसान होते.
- या स्मारकापासून रावणाचा पुतळा शक्य तेवढ्या लांब असावा तसेच पुतळ्याची उंची स्मारकाच्या किमान दुप्पट असावी. त्यामुळे पुतळ्याचे दहन करताना स्मारकाला नुकसान होणार नाही.
- अशा आयोजनांमध्ये आतिषबाजी केली जाते. यामुळे प्रदूषण होते. पर्यावरणाचे होणारे हे नुकसान भरून काढण्यासाठी आयोजक सनातन धर्म ययुवक सभेला कस्तूरचंद पार्कमध्ये वृक्षारोपण करून वर्षभर जतन करावे लागेस. विशेष म्हणजे त्यांनी लावलेले रोपे पुढील वर्षांपर्यंत जगणे आवश्यक आहे.