रविंद्रकुमार सिंगल नागपुरचे नवे पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांची पुण्याला बदली

By योगेश पांडे | Published: January 31, 2024 08:24 PM2024-01-31T20:24:40+5:302024-01-31T20:24:55+5:30

चंद्रपुरला मिळाले नवीन अधीक्षक

Ravindra Kumar Singal is the new Police Commissioner of Nagpur, Amitesh Kumar has been transferred to Pune | रविंद्रकुमार सिंगल नागपुरचे नवे पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांची पुण्याला बदली

रविंद्रकुमार सिंगल नागपुरचे नवे पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांची पुण्याला बदली

नागपूर: लोकसभा निवडणूकांच्या अगोदर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक काळ नागपुरात पोलीस आयुक्तपदी राहिलेले अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांची नागपूर पोलीसआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मागील अनेक महिन्यांपासून नागपुरच्या पोलीस आयुक्तांची बदली होईल अशा चर्चा सुरू होत्या. सिंघल यांचे नाव यात आघाडीवर होते व अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

गृह विभागाने बुधवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. अमितेश कुमार यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू होतीच. मात्र नागपुरात नवीन पोलीस आयुक्त म्हणून कुणाला जबाबदारी मिळणार याबाबत वेगवेगळी नावे चर्चेला होती. यात विधि व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक पदावर असलेले संजय सक्सेना, वायरलेस विभागाचे अपर पोलिस महासंचालक असलेले सुनील रामानंद, रवींद्रकुमार सिंगल, संजीव सिंगल, सुरेशकुमार मेकला, आणि अनुपकुमार सिंह यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यावर लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी राहणार असल्याचे स्पष्टच होते. सर्वच आघाड्यांवर चाचपणी झाल्यावर अखेर रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाची धुरा आली आहे.

अमितेश कुमार यांच्या नावावर अनोखा रेकॉर्ड
पोलिस आयुक्त अमितेशकुमार हे सप्टेंबर २०२० रोजी नागपुरात रुजू झाले होते. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलिस आयुक्तपदी राहण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला आहे. तीन वर्ष पाच महिने ते या पदावर होते. त्यांच्या कार्यकाळात २०२०, २०२१ मध्ये गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात मदत मिळाली होती. फेब्रुवारी २०२३ हा महिना तर एकही हत्येची नोंद न झालेला महिना ठरला होता.

याशिवाय एमपीडीए, मकोका इत्यादी कारवायांमध्येदेखील वाढ झाली होती. त्यांनी ऑपरेशन नार्को फ्लशआऊट राबवत अंमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यावरदेखील भर दिला होता. मात्र महिला अत्याचार, चोरी, घरफोडी, अपहरण, हत्या यासारखे गुन्हे २०२२, २०२३ मध्ये वाढल्याचे दिसून आले. एनसीआरबीच्या अहवालातदेखील अनेक गंभीर गुन्ह्यांचा गुन्हेदर वाढलेलाच होता. विधीमंडळातदेखील या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

संदीप पाटील यांची पदोन्नती
दरम्यान, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नती झाली आहे. त्यांच्याकडे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग) नामदेव चव्हाण यांची नागपूर येथे रा.रा.पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

मुमक्का सुदर्शन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक
नागपूरच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. सुदर्शन हे तरुण व तडफदार अधिकारी म्हणून ओळखण्यात येतात. नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांची नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष कृती गटाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) रमेश धुमाळ यांच्याकडे नागपूर ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Ravindra Kumar Singal is the new Police Commissioner of Nagpur, Amitesh Kumar has been transferred to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर