९७व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 11:18 AM2023-06-26T11:18:53+5:302023-06-26T11:20:25+5:30
९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अमळनेर येथे पार पडणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे.
रविवारी पुणे येथे पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शोभणे यांच्याशिवाय अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ बालसाहित्यिक न. म. जोशी, आदींची नावे चर्चेत होती. याच बैठकीत हे संमेलन डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचे सुचविण्यात आले आहे.
डॉ. रवींद्र शोभणे यांच्या होळी, उत्तरायण, चिरेबंद, पांढरे हत्ती, अश्वमेध, कोंडी, पडघम, सव्वीस दिवस, आदी अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध असून, तसेच शहामृग, वर्तमान, दाही दिशा, आदी कथासंग्रह प्रकाशित असून ते आत्मकथन, वैचारिक, ललित, विश्लेषणात्मक अशा विपुल ग्रंथसंपदेचे धनी आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रहही प्रसिद्ध आहेत. ते विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष असून, विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्धापन दिनाच्या पर्वावर वर्धा येथे पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.