लग्न करण्यासाठी बनला ‘रॉ’ एजंट, मुंबई पोलिसांच्या खबऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 05:36 AM2019-06-14T05:36:06+5:302019-06-14T05:36:41+5:30
२४ तास चालले नाट्य : मुंबई पोलिसांच्या खबऱ्याला अटक
नागपूर : लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून मुंबई पोलिसांच्या एका खबºयाने शहर पोलिसांची झोप उडविली. २४ तास चाललेल्या या ‘ड्रामा’नंतर युवकाचा बोगसपणा उघडकीस आला. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९ रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार इमरान हा मुंबई पोलिसांचा खबरी म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदान परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. इमरानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली. इमरानने
तिला लग्नाची मागणी घातली. महिलेनेही ती स्वीकारली. तो तिला भेटण्यासाठी १५ दिवसापूर्वी नागपुरात आला. लग्न करणार असल्याने तो तिच्या घरीच कुटुंबीयांसोबत राहू लागला.
वेगवेगळी कारणे सांगून त्याने १५ दिवसांत महिलेकडून ३० हजार रुपये घेतले. त्याच्या एकूणच व्यवहारावरून महिलेला संशय आला. तिने मंगळवारी इमरानच्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे व घरी त्याच्याशिवाय दुसरे कुणीही नसल्याचे सांगितले. यानंतर महिलेने त्याला ‘रॉ’चे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. यावर तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यामुळे तिचा संशय आणखीनच वाढला. त्यातून इमरान दुखावला गेला आणि इमरान स्वत: गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेला. त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी श्वेता खेडकर आणि अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी यांनाही फोन केला. आपण ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून लग्नासाठी मदत करण्यास सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याशी संपर्क केला. यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. गिट्टीखदान पोलीस इमरानला घेऊन ठाण्यात आले. एपीआय सुदर्शन गायकवाड यांनी बुधवारी दिवसभर इमरानला विचारपूस केली. त्यावरून त्याचा ‘रॉ’शी कुठलाही संबंध नसल्याचे आढळून आले.
दुसºयांना प्रभावित करण्यात इमरान तरबेज
इमरानच्या बोलण्यावर कुणीही संशय घेऊ शकत नाही. तो इंग्रजीसह आठ भाषांचा जाणकार आहे. त्याच्या बोलण्याने कुणीही सहजपणे प्रभावित होऊ शकतो. यामुळेच महिला व तिचे कुटुंबीयसुद्धा प्रभावित झाले होते. त्याच्या बोलण्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावून गेले होते. त्याच्या सांगण्यानुसार जेव्हा मुंबईतील काही पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधला असता इमरान पोलिसांचा खबरी असल्याचे उघडकीस आले.