‘आरसी’ आता नव्या रूपात; पहिल्यांदाच लेझर तंत्राचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 08:00 AM2023-06-13T08:00:00+5:302023-06-13T08:00:02+5:30
Nagpur News वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) मागील दोन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) मागील दोन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. नव्या स्मार्ट कार्डमध्ये पहिल्यांदाच लेझर तंत्राचा वापर होणार असल्याने वाहनधारकाचे नाव आणि फोटो उत्कृष्ट दर्जाचा छापला जाणार आहे.
परिवहन विभागाने २००६ पासून कागदी ‘आरसी’ व वाहन परवाना देणे बंद केले. त्या जागी स्मार्ट कार्ड मिळू लागले. यासाठी खासगी कंपनीची सेवा घेतली. नुकतेच परिवहन विभागाचा स्मार्ट कार्ड निर्मितीबाबतचा हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीसोबतचा करार संपुष्टात आला. परिणामी, दीड ते दोन महिन्यांपासून स्मार्ट कार्डचा तुटवडा पडला. पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातून ज्यांना परवाना किंवा ‘आरसी’ची गरज आहे त्यांना तसे ‘पर्टीक्युलर’ म्हणजे संबंधित कागदपत्राची तपशीलवार माहितीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यानच्या काळात परिवहन विभागाने कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड ॲण्ड टेक्नाॅलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’, कंपनीसोबत करार केला. कंपनीने नुकतीच सात कोटींची अनामत रक्कम बँकेत जमा केली. यामुळे १ जुलैपासून परवाना व आरसी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-मुंबई, पुणे व नागपुरात होणार छपाई
परिवहन विभागाचे संगणक विभागप्रमुख संदेश चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले, नवे वाहन परवाना व ‘आरसी’ची छपाई मुंबई, पुणे व नागपुरात होईल. तेथून पोस्टाच्या मदतीने संबंधित वाहनधारकांना उपलब्ध होईल.
-अवयवदानाचाही असणार कॉलम
नव्या वाहन परवान्यावर अवयवदान करण्यासाठी आपली संमती आहे किंवा नाही याचाही कॉलम असणार आहे. यामुळे अपघातात जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्यांकडून अवयवदानाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
-‘आरसी’वर आता नसणार चीप
दोन महिन्यांपूर्वीपर्यंत आरटीओकडून दिल्या जाणाऱ्या ‘आरसी’वर चीप राहायची. परंतु आता नव्या ‘आरसी’वर चीप नसणार. स्मार्ट कार्डच्या मागे वाहनमालकाचा फोटो असणार आहे.
-लायसन्सवर लेझर तंत्राचा वापर
लायसन्सवरील नाव व फोटो उत्कृष्ट दर्जाचा छापण्यासाठी लेझर तंत्राचा वापर केला जाणार आहे. १ जुलैपासून नव्या स्वरूपातील वाहन परवाना व ‘आरसी’ उपलब्ध होतील.
-संदेश चव्हाण, प्रमुख संगणक विभाग, परिवहन विभाग