विदर्भात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; भीती गेली, उपाययोजनांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:29 AM2021-02-15T10:29:56+5:302021-02-15T10:32:18+5:30
Nagpur News गेल्या काही दिवसात विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, यवतमाळ व नागपूर या प्रमुख शहरांत वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अमरावतीत तर रविवारी ३९९ पॉझिटिव्ह निघाले असून तिघांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसात विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, यवतमाळ व नागपूर या प्रमुख शहरांत वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अमरावतीत तर रविवारी ३९९ पॉझिटिव्ह निघाले असून तिघांचा मृत्यू झाला.
अमरावती जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार २९४ संक्रमितांची नोंद झाली, तर मृतांची संख्या ४३५ झाली आहे. १० फेब्रुवारीपासून सातत्याने तीन शतकी रूग्णसंख्येने अमरावतीकरांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
त्रिसूत्रीचे पालन विसरले
कोरोना लस येताच, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करणे विसरले आहेत. केवळ ५ ते १० टक्केच नागरीक मास्कचा वापर करतात. शारीरिक अंतराचे पालन कुठेही दिसून येत नाही. बाजारपेठेतील गर्दी बघता, कोरोनाचा स्फोट होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे. नियमित हात धुणे तर आता बंदच झाले आहे. कोरोना वाढीस बहुधा नागरिक जबाबदार असल्याचे एकंदर चित्र आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रविवारी तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी १३.६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी हे प्रमाण १०.२९ टक्के इतके होते. रविवारी जिल्ह्यात ४५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर सहाजणांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. शनिवारी ११९ नवे रुग्ण आढळल्यानंतर लगेच रविवारीही तब्बल ११५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा चक्क ६०१ एवढा झाला आहे.