जन आरोग्य योजनेला पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:50 AM2020-02-04T00:50:32+5:302020-02-04T00:51:31+5:30
सुधारित जन आरोग्य योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगितले जात असले तरी शासनाने पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी जुन्याच योजनेला मुदतवाढ दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरीब रुग्णांसाठी आणखी फायद्याची व्हावी, यासाठी २०१७ मध्ये योजनेचे नाव बदलविले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे नाव दिले. मात्र याजेनेत फारसे बदल केले नाहीत. सुधारित जन आरोग्य योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगितले जात असले तरी शासनाने पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी जुन्याच योजनेला मुदतवाढ दिली.
दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७१ आजारांचा समावेश केला. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष १ लाख ५० हजार रुपयांची विमा संरक्षणाची रक्कम दिली जात होती. या योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपणार होती. तत्कालीन सरकारने या योजनेचे नाव बदलविण्याचा व गोरगरीब रुग्णाभिमुख ही योजना करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणाही केली. यात विमा संरक्षणाची रक्कम ५० हजाराने वाढवून ती दोन लाख करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०१७ पासून जुन्या योजनेच्या नावात बदल करून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नाव दिले. परंतु विम्याच्या रकमेत वाढ केली नाही. नव्या ३२९ आजारांचा समावेश केला असला तरी, या आजारावर केवळ शासकीय रुग्णालयातच उपचार घेता येईल, ही अट टाकली. दरम्यानच्या काळात या योजनेचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्न करण्यात आले. परंतु दोन्ही योजना एकत्रितपणे राबविण्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपुष्टात आली. यामुळे नव्या वर्षात सुधारित जन आरोग्य योजना सुरू होण्याची शक्यता होती. परंतु पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देते कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वारंवार मुदतवाढच
‘राजीव गांधी’ योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपणार होती व २ ऑक्टोबरपासून महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू होणार होती. परंतु, जुन्या योजनेला २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, नंतर त्यात पुन्हा वाढ करून मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढविली. शासनाने या जुन्या योजनेत खंड पडू न देता १ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने ही योजना सुरू ठेवली. १ एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ पर्यंत, नंतर ३० जून ते १ जुलै, नंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर, ३० सप्टेंबर ते ३१ डिसेंबर, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आणि आता १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.