योजनेतील साहित्याऐवजी अंगणवाड्यात, आधिच उपलब्ध साहित्यांचा पुन्हा पुरवठा
By गणेश हुड | Published: April 29, 2024 03:57 PM2024-04-29T15:57:05+5:302024-04-29T16:01:34+5:30
Nagpur : योजना चौकशीच्या फेऱ्यात; बहुसंख्य अंणवाड्यात आधिच उपलब्ध साहित्याची खरेदी दर्शविण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांना अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेतून साहित्याचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची धावाधाव सुरु आहे. परंतु पुरवठा होत असलेल्या साहित्यात योजनेतील साहित्य पुरविता आधिच उपलब्ध साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. परिणामी आता ही संपूर्ण योजनाच चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.
अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासोबत डागडुजी, बांधकाम, सौरप्रकल्प, दरवाजे, खिडकी आदींसोबतच पिण्याच्या पाण्याची सोय, बेबी फ्रेण्डली शौचालय, सुरक्षाभिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते. या कामासाठी दोन टप्प्यांत एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. जिल्हा हा सर्व निधी पंचायत समितीस्तरावरील चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर (सीडीपीओ) यांच्या खात्यात वळता करण्यात आला.
योजना चौकशीच्या फेऱ्यात
सीडीपीओंनी शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार ४९ अंगणवाड्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात आलेले नाही. बहुसंख्य अंणवाड्यात आधिच उपलब्ध टीव्ही, ऑफिस अलमारी, पाणी शुद्धीकरणाचे इलेक्ट्रिक यंत्र, १०० किलो धान्यक्षमतेची कोठी, हात धुण्याचे यंत्र, ग्रीन मॅट व डिजिटल मल्टिकलर प्रिंटर आदी साहित्याची खरेदी दर्शविण्यात आली आहे. तसेच या साहित्याबाबत कुठलेही स्पेसिफिकेशन निश्चित करण्यात आले नाही. टीव्ही किती इंची असावी, धान्यकोटी लोखंडी, स्टील किंवा सिंथेटिक असावी, प्रिंटर आदींबाबत काहीच निश्चित करण्यात आले नाही. शासकीय मानके डावलून हा सर्व प्रकार झाल्याची माहिती पुढे येत आहे.