कोरोनावर मात केलेल्या नागपुरातील ३७८ रुग्णांवर पुन्हा उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:12 PM2020-10-27T22:12:35+5:302020-10-27T22:13:43+5:30
Re-treatment on overcame Corona patients , Nagpur newsजिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ९३ हजारांवर गेली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८५ हजारांवर पोहचली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांना काहीना काही त्रास होत आहे. त्याचे निदान व उपचारासाठी मेयो, मेडिकलमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ची सोय करण्यात आली आहे. मागील १५ दिवसात या दोन्ही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ३७८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ९३ हजारांवर गेली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८५ हजारांवर पोहचली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांना काहीना काही त्रास होत आहे. त्याचे निदान व उपचारासाठी मेयो, मेडिकलमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ची सोय करण्यात आली आहे. मागील १५ दिवसात या दोन्ही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ३७८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यातील काहींना ‘लंग फायब्रोसीस’ असल्याचे निदान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. नव्याने आढळून येणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण काहीसे जास्त असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात करोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण आणखी वाढण्याचीही दाट शक्यता आहे. असे एकीकडे चित्र असताना, दुसरीकडे करोनामुक्त व्यक्तींमध्ये काही प्रमाणात तक्रारी समोर येत आहे. यातील अनेक तक्रारी या सामान्य, तर काही गंभीर आहेत. या व्यक्तींवर वेळीच उपचार होण्याच्या दृष्टीनेच मेयो, मेडिकलमध्ये कोरोना पश्चात उपचारांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. कोरोनामुक्त महिला व पुरुषांसाठी औषधवैद्यकशास्त्र विभागाची, तर करोनामुक्त मुले व मुलींसाठी बालरोगतज्ज्ञाची चमू कार्यरत आहे. मेयो, मेडिकलमध्ये सप्टेंबर महिन्यापासून या ओपीडीला सुरुवात झाली. परंतु मागील १५ दिवसात रुग्णांत वाढ झाली आहे. मेयोमध्ये २०० तर मेडिकलमध्ये १७८ रुग्णांनी ओपीडीस्तरावर उपचार घेतला आहे.
२१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
मेडिकलच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये २१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण होते. यात ४६ पुरुष व ३९ महिला असे एकूण ८५ रुग्ण होते. १० ते २० वयोगटात दोन मुले व एक मुलगी होती. ४१ ते ५० वयोगटात १८ पुरुष व २१ महिला असे ३९, ५१ ते ६० वयोगटात १९ पुरुष व २३ महिला असे एकूण ४२ तर ६१ ते ७० वयोगटात तीन पुरुष व चार महिला असे एकूण ९ रुग्णांनी उपचार घेतले.
या लक्षणांचे रुग्ण अधिक
कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये घसा खवखवणे, सर्दी होणे, दम लागणे, अंग दुखणे अशी लक्षणे असलेले सर्वाधिक रुग्ण ''पोस्ट कोविड ओपीडी''त दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या व्यक्तींवर उपचार करून पुन्हा तपासणीसाठी बोलविले जात आहे. या रुग्णांसाठी बालरोगतज्ज्ञ व फिजिशियन डॉक्टरांची टीम रुग्णालयात सज्ज आहे.
लंग फायब्रोसीसचे दोन ते तीन रुग्ण
कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. रुग्ण बरे झाल्यानंतरही काहींमध्ये ‘फायब्रोसीस’ म्हणजेचे फुफ्फुसांचे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. मेयो व मेडिकलमध्ये या आजाराचे केवळ दोन ते तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रुग्णांची संख्या वाढत आहे
मेडिकलच्या ‘पोस्ट कोविड ओपीडी''मध्ये अलिकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या लक्षणांवरून औषधोपचार केला जात आहे. मुख्य म्हणजे कोरोनामुक्त व्यक्तींना नेमके कोणकोणते त्रास संभवतात, अशा त्रासांची तीव्रता किती व कशा प्रकारची असू शकते, अशा तक्रारींवर कोणत्या औषधांचा नेमका किती व कसा परिणाम होतो आदी बाबींचा शास्त्रशुद्ध ''डेटा''ही तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल