दरदिवशी २०० घरांपर्यंत पोहचा

By admin | Published: May 30, 2017 01:56 AM2017-05-30T01:56:50+5:302017-05-30T01:56:50+5:30

‘मिशन २०१९’ डोळ््यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पावले उचलली जात असून सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या मुद्यावर विशेष बैठक घेतली.

Reach 200 homes every day | दरदिवशी २०० घरांपर्यंत पोहचा

दरदिवशी २०० घरांपर्यंत पोहचा

Next

अमित शाह यांची सूचना : भाजपाच्या ‘कोअर’ समितीची घेतली बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिशन २०१९’ डोळ््यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पावले उचलली जात असून सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या मुद्यावर विशेष बैठक घेतली. या बैठकीत शहरातील आमदार, पक्षाचे संघटनमंत्री व ‘कोअर’ समितीचे सदस्य सहभागी होते. पक्षाच्या विस्तारक योजनेअंतर्गत १५ जूनपर्यंत बूथनिहाय दरदिवशी २०० घरांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी पोहोचावे व केंद्राच्या विविध योजना, पक्षांची धोरणे याबाबत जागृती करावी, असे ‘टार्गेट’च शाह यांनी दिले.
देशभरात भाजपाचा विस्तार व्हावा यासाठी अमित शाह ११० शहरांच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर शाह थेट रविभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्यासह शहरातील सर्व आमदार, पक्षाचे महामंत्री, संघटनमंत्री उपस्थित होते. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके यांनी भाजपाने नागपूर शहरात केलेल्या कार्यविस्ताराबाबत विस्तृत माहिती सादर केली. त्यानंतर शाह यांनी विस्तारक योजनेच्या तयारीसंदर्भात पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. सोबतच कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या इत्यादीबाबतदेखील त्यांनी विचारणा केली. बूथ विस्तारकांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत संपर्क साधण्यात येणार आहे. प्रभाग पातळीवर पक्षाला आणखी मजबुती मिळावी व कार्यकर्त्यांचे ‘नेटवर्क’ आणखी मजबूत व्हावे यासाठी या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत. प्रत्येक ‘बूथ’वर १५ दिवसांत दररोज किमान २०० घरांपर्यंत पोहोचलेच पाहिजे, अशी सूचनाच शाह यांनी केली. या योजनेअंतर्गत मतदारांना सरकारचे काम, विविध योजना तसेच पक्षाची भूमिका याबाबत सखोल माहिती दिली गेली पाहिजे. यासाठी प्रचारसाहित्य, पत्रके यांचे वाटपदेखील करण्यात यावे, असे शाह यावेळी म्हणाले. बूथ विस्तारकांच्या प्रशिक्षणाबाबतदेखील शाह यांनी यावेळी जाणून घेतले. दरम्यान, या बैठकीनंतर दुपारी ३.३० च्या सुमारास आ.अनिल सोले यांनी शाह यांची भेट घेतली. सोले यांनी शाह यांना ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’ तसेच ‘ग्रीन अर्थ फाऊंडेशन’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत माहिती दिली.

भाजपाचे ‘मिशन ४००’
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपाकडून किमान ४०० जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून बूथपातळीवर संघटना मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबतच चर्चा करून स्थानिक पातळीवर योजना आखली पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. कार्यकर्तेच पक्षाचा आधारस्तंभ आहेत. पक्षातील जुनेजाणते व वरिष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क साधा, असे शाह यांनी यावेळी ‘कोअर’ समितीच्या सदस्यांना सांगितले. १६ ते १८ जून या कालावधीत शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर परत येणार आहेत. यावेळी बूथ विस्तारक योजनेचा सविस्तर अहवाल मांडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Reach 200 homes every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.