म्युकरवरील इंजेक्शनमुळे रुग्णांना रिअॅक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:24+5:302021-06-28T04:07:24+5:30
नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’ या इंजेक्शनमुळे मेडिकलमधील रुग्णांना ‘रिअॅक्शन’ आल्याने खळबळ उडाली आहे. ...
नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’ या इंजेक्शनमुळे मेडिकलमधील रुग्णांना ‘रिअॅक्शन’ आल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकल प्रशासनाने या इंजेक्शनच्या वापरावर बंदी आणली आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद येथील मेडिकलमध्येही असाच प्रकार घडल्याने त्या ‘बॅच’च्याही इंजेक्शनवर बंदी आणली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसने चिंता वाढवली आहे. मागील सहा दिवसांत ६७ रुग्ण व १२ मृत्यूची भर पडली. रविवारी शासकीय रुग्णालयात तीन, तर खासगीमध्ये दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५८२वर पोहचली असून, मृतांची संख्या १५० झाली आहे. रुग्ण वाढत असताना या आजाराच्या उपचारात महत्त्वाचे असलेले ‘अॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’चा तुटवडा अद्यापही कायम आहे. प्राप्त माहितीनुसार, २३ जून रोजी ‘एलबीडी १४८’ या बॅच क्रमांकाचे ‘लायका लेब्रोटरीज्’चे ‘अॅम्फोटेरिसिन बी’चा मोठा साठा मेडिकलला मिळाला. परंतु इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांना थंडी वाजून ताप, मळमळणे आदी लक्षणे दिसून आलीत. २५ तारखेला पुन्हा याच इंजेक्शनचा नवा स्टॉक आला असतानाही रुग्णांना तीच लक्षणे दिसून येताच मेडिकल प्रशासनाने २६ तारखेला पत्र काढून या इंजेक्शन वापरावर बंदी आणली.
-७७ इंजेक्शन परत पाठविली
मेडिकलमध्ये सध्याच्या स्थितीत म्युकरमायकोसिसचे ११८ रुग्ण उपचार घेत आहेत. २५ जून रोजी वॉर्डात मिळालेल्या इंजेक्शनमधून जवळपास ७७ इंजेक्शन परत करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या इंजेक्शन नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.
-आरोग्य विभागाकडून मिळाले इंजेक्शन
‘अॅम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने मागील महिन्यापासून खरेदी व वाटपप्रक्रिया आपल्या हाती घेतली. २३ जून रोजी मेडिकलला अडीच हजारावर या इंजेक्शनचा साठा मिळाला. यात दोष असलेल्या ‘बॅच’चे इंजेक्शनचा समावेश असल्याचे एकाअधिकाऱ्याने सांगितले.