ध्वजारोहणापूर्वी व्हावे संविधान प्रास्ताविकेचे वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:06+5:302021-01-25T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम व इतर सर्व शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहण करण्यापूर्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम व इतर सर्व शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहण करण्यापूर्वी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व्हावे, यासंदर्भात राज्य सरकारने सर्व विभागांना निर्देश द्यावे, अशी मागणी संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २२ जानेवारी २०२० रोजी एक परिपत्रक काढले होते. हे परिपत्रक ग्रामविकास विभागाचे असल्यामुळे जिल्हा परिषद व त्याचे सर्व कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायतला लागू आहे. संविधानाची तत्त्वमूल्ये नागरिकांमध्ये रुजविणे हा यामागील उद्देश आहे. अभिनंदनीय असे हे पाऊल आहे. मात्र, हे परिपत्रक जिल्हाधिकारी यांना पाठविले नाही. त्यामुळे इतर विभाग याचे पालन करतील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने काढलेले शासन परिपत्रक सर्वांसाठी लागू करण्यात यावे किंवा सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक काढावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.