संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:45 PM2019-12-20T22:45:49+5:302019-12-20T22:46:48+5:30
ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
विधानभवनातील सदस्यांच्या फोटोसेशननंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्यासारखा शेतकऱ्यांचा मुलगा त्यांच्यामुळेच विधानसभेत आला. सर्वसामान्य परिवारातून येऊनही जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी संविधानामुळे मिळाली. त्यामुळे संविधानाचे वाचन पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी करण्याचा नवा पायंडा घातला. जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा लोकशाहीतून दिली, त्याची आठवण आणि स्मरण करता यावे यासाठी हे वाचन केले.
तीन पक्षांचे सरकार असलेली विधानसभा चालविताना विरोधकही प्रचंड आक्रमक आहेत. पहिले दोन दिवस कामकाज होऊ दिले नाही. अध्यक्ष म्हणून काम करताना कसब पणाला लागले का, यावर ते म्हणाले, नवीन सरकार आल्यावर सुरुवातीला त्रास होतच असतोच. त्याप्रमाणे झाला. आता सर्व व्यवस्थित सुरू असून कामकाजही शांतपणे चालले आहे. प्रश्नोत्तरे व चर्चाही नीटपणे सुरू आहे. सर्वांचेच सहकार्य आपणास मिळत आहे.
फोटोसेशन गैरहजेरी, चुकीचा अर्थ काढू नये
विधानसभा अध्यक्ष या नात्याने शुक्रवारी सकाळी फोटोसेशनसाठी नाना पटोले यांनी सर्वांना निमंत्रित केले होते. मात्र विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. ते व्यक्तिगत कामाने गैरहजर असल्याने त्यांच्या नसण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. ते म्हणाले, सर्वच पक्षांतील वरिष्ठ नेते, आमदार उपस्थित होते. फोटोसेशनचे डिक्लेरेशन विधानसभेत केले होते. संदेशही विधिमंडळाच्या यंत्रणेमार्फत पाठविला होता. मात्र कुणी वैयक्तिक कामाने गैरहजर असतील तर चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. माझ्यासाठी सत्तापक्ष आणि विपक्ष दोघेही सारखेच आहेत. त्यामुळे आपण त्या राजकारणात पडू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.