Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 09:55 PM2019-09-25T21:55:28+5:302019-09-25T22:00:28+5:30
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, निशिकांत सुके, शिरीष पांडे तसेच विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रासंदर्भात पूर्वसूचना देण्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची सुविधा विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात यावी. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होत असून, नामनिर्देशनपत्र ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. छाननी ५ ऑक्टोबर रोजी होईल. त्यांनतर ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकीद्वारे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.