बलात्काराच्या आरोपात फसवून खंडणी उकळणारे बंटी-बबली जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 12:34 PM2022-05-04T12:34:49+5:302022-05-04T12:38:31+5:30
मेघालीने आतापावेतो वर्धा आणि एमआयडीसीतील एका उद्योजकासह एक डझनपेक्षा जास्त जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे.
नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध प्रस्थापित करायचे आणि नंतर बलात्काराचा आरोप लावून खंडणी वसूल करायची, अशी कार्यपद्धती असलेल्या एका कुख्यात महिलेसह तिच्या साथीदाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली. मेघाली उर्फ भाविका (वय ३५) आणि मयूर राजू मोटघरे (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. बंटी-बबली नावाने ते कुख्यात आहेत.
तिच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र रमेशलाल वनवानी (वय ३२, रा. जरीपटका) असून, ते भाजीचा व्यवसाय करतात. अनेक दिवसांपासून मेघाली महेंद्रकडे भाजी घ्यायला जात होती. त्यामुळे त्यांच्यात ओळख आणि नंतर मैत्री झाली. पुढे भेटीगाठी वाढल्यानंतर मेघालीने महेंद्रला पतीच्या अत्याचारामुळे आपण एकटीच जुनी मंगळवारी, लकडगंजमध्ये भाड्याच्या घरात राहते, असे सांगून त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर महेंद्रसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, मेघालीकडे आरोपी मोटघरे नियमित यायचा. तो मावसभाऊ असल्याचे तिने महेंद्रला सांगितले होते. वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या महेंद्रच्या घरी १६ सप्टेंबर २०२१ ला ती धडकली. लग्न कर, अन्यथा तुला बलात्काराच्या आरोपात फसवेल, अशी धमकी तिने महेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यामुळे लग्न करून महेंद्र तिच्यासोबत राहू लागला. मात्र, आठच दिवसांत तिने त्याला कुटुंब सोडण्यास आणि भाड्याचे घर घेण्यास बाध्य केले. त्यानंतर एक दिवस अचानक महेंद्र घरी धडकला. त्यावेळी त्याला मेघाली आणि मोटघरे शरीरसंबंध जोडताना दिसले. त्यामुळे मेघालीसोबत महेंद्रचे कडाक्याचे भांडण झाले आणि महेंद्रने तिच्याशी नाते तोडले.
त्यानंतर मेघालीने महेंद्रविरुद्ध बलात्कार करून छळ करण्याच्या आरोपाखाली जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या कुटुंबीयांवरही छळाचा आरोप लावला. पोलिसांनी महेंद्रला अटक करून कारागृहात डांबले. त्यानंतर मेघाली अधिकच आक्रमक झाली. कारागृहात भेटून महेंद्रला पैशांची मागणी केली. नाही दिल्यास तुझी आणि नातेवाइकांची जमानत होऊ देणार नाही, तुझा मर्डर करेन, अशीही धमकी देत महेंद्रकडून २.१० लाख रुपये हडपले.
हनीट्रॅपचा खुलासा
मेघालीने आतापावेतो वर्धा आणि एमआयडीसीतील एका उद्योजकासह एक डझनपेक्षा जास्त जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. ज्यांनी तिला खंडणीची भीक घातली नाही, अशांविरुद्ध तिने मोटघरेच्या मदतीने वर्धा, नंदनवन, लकडगंज, बुटीबोरी, एमआयडीसी आणि जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवून त्यांना बलात्काराच्या आरोपात अडकवले. आता मात्र तीच पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने पुन्हा काही खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.